*कोंकण Express*
*विधानसभेत केसरकरांचा पराभव करणे हेच आमचे उद्दि…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
विधानसभेत भगवा फडकवणे आणि केसरकरांचा पराभव करणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात शिवसेनेची ताकद असून महाविकास आघाडीतून हा मतदारसंघ आम्हाला द्यावा, असा एकमुखी ठराव घेण्यात आला आहे. शिवसैनिकांची भावना पक्षप्रमुखांकडे पोहचवणार आहे, असे मत उबाठा शिवसेना तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांनी व्यक्त केले. आज सावंतवाडी मतदारसंघातील प्रमुख नेत्यांच्या झालेल्या बैठकीनंतर तालुकाप्रमुख रुपेश राऊळ हे पत्रकार परिषदेत बोलत होते.
जर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात कोणी येत असेल तर त्यांचे आम्ही स्वागतच करू. आमच्या पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे. भाजप नेते उबाठा शिवसेनेच्या वाटेवर असणाऱ्या चर्चाबद्दल तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांना विचारलं असता, राऊळ यांनी अशा प्रकारे उत्तर दिले. साचंतवाडी मतदारसंघात आजच्या क्षणाला आमची ताकद अधिक आहे. आमची बांधणी ग्रामपंचायत पासून जिल्हा परिषद पर्यंत असल्याने सावंतवाडी मतदारसंघातील विधानसभेची उमेदवारी आमच्या पक्षाला द्यावी. ही आमची प्रमुख मागणी आहे. महाविकास आघाडीत आमची ताकद अधिक असल्याचे आम्ही पक्षप्रमुखांना कळवले आहे. पक्ष आम्हाला वाढावयाचा आहे. आमचा पक्षाचा उमेदवार निवडून आणायचा आहे. आमचे स्वप्न भगवा फडकवणे आहे. मतदारसंघात पक्षाकडून उमेदवारीसाठी बाबुराव धुरी, चंद्रकांत गावडे, रूपेश राऊळ, बाळू परब, मायकल डिसोझा ही नाव पक्षाकडे गेली असल्याचे राऊळ म्हणाले.
दरम्यान, सावंतवाडीतून मशाल चिन्हावर लढणारा उमेदवार असावा अशी आमची प्रमुख मागणी आहे. हा ठराव संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांच्या मार्फत पक्षप्रमुखांना पाठवणार आहे अशी माहिती श्री. राऊळ यांनी दिली.
बाहेरच्या तालुक्यातील लोक इथे येऊन उमेदवारीसाठी प्रयत्न करतात ही बाब दुर्दैवी आहे. इथल्या शेतकऱ्यांचा मुलगा आमदार झाला तर येथील लोकांचे दुःख तो जाणू शकतो. कोणीतरी यावे टीचकी मारून जावे, असे होऊ नये. आमदारकीचे स्वप्र पूर्ण करण्यासाठी हा मतदारसंघ नाही असे मत उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी यांनी व्यक्त केले. याप्रसंगी सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ, वेंगुर्ला तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब, दोडामार्ग तालुकाप्रमुख संजय गवस, उपजिल्हा प्रमुख बाबुराव धुरी, प्रकाश गडेकर, चंद्रकांत कासार, मायकल डिसोझा आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

