*कोंकण Express*
*आमदार व्हावे ह्यासाठी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ नाही : बाबुराव धुरी*
*सावंतवाडी विधानसभा मतदारसंघावर शिवसेनेचाच (उबाठा )अधिकार*
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक जण सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ म्हणजे कोणीही यावे आणि टिचकी मारून जावे असा मतदारसंघ नसून या मतदारसंघास संस्थानिक काळाचा वारसा आहे. मात्र अनेकांनी हा मतदारसंघ स्वतःच्या फायद्यासाठी वापरला आहे. यामुळे सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील जनता चांगलीच भाजून पोळून निघालेली आहे.त्यामुळे यावेळी जनता ही सुज्ञ झाली असून अशा फायद्यासाठी धनाचा वापर करून मतदारास कमी लेखणाऱ्यांची मस्ती उतरवण्याचा चंगच जनतेने बांधला आहे. या मतदारसंघातून सर्वसामान्य शेतकऱ्याच्या मुलास आपला प्रतिनिधी केला केला तरच जनतेला न्याय मिळू शकतो हे जनतेने ओळखले आहे. त्यामुळे जनतेला आता बदल हवा असून जनता हा बदल करण्याचे वाट पाहत असल्याचे म्हणत शिवसेना (उबाठा) उपाजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी सावंतवाडी विधानसभेच्या उमेदवारी साठी भाऊगर्दी करणाऱ्या अनेकांचे कान टोचले असून सावंतवाडी मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला असून येथून शिवसेना उबाठाचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास प्रसिद्धीपत्रका द्वारे व्यक्त केला आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, सलग दहा वर्षे हा मतदारसंघ शिवसेनेकडे राहिला आहे त्यामुळे या मतदारसंघावर शिवसेनेचाच अधिकार आहे आणि हा निकष राज्यातील इतर सर्व मतदार संघामध्ये आहे तसा सावंतवाडी मतदार संघासाठी आहे, सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात मित्र पक्षांमध्ये काम करत असताना आपण निवडणूक ही अपक्ष लढवणार अशी भाषा कोणी करत असेल तर ते चुकीचे आहे, सध्या महाविकास आघाडीमध्ये जो काही निर्णय वरिष्ठ घेतील तो आपणास मान्य आहे असे समजून प्रत्येकाने काम करणे गरजेचे आहे, असे म्हणत महाविकास आघाडीतील मित्रपक्षामधील निवडणूक लढवण्यास इच्छुक असणाऱ्यावरही श्री. धुरी यांनी हल्ला चढवला. सध्या मतदारसंघाची परिस्थिती पाहताच अनेक धनाढ्य लोक लोकसभेप्रमाणे विधानसभेत सुद्धा आपण पैसे देऊन मत विकत घेऊ अशा भ्रमात आहेत व त्याप्रमाणे निवडणुकीची तयारी धनशक्तीच्या माध्यमातून करत आहेत मात्र इथली जनता सुज्ञ आहे स्थानिक उमेदवारास प्राधान्य देऊन जनता इथला स्थानिक व जनतेची कामे करणारा उमेदवार हा विधानसभेवर पाठवतील याची मला खात्री असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे शिवसेना उबाठाचे उपजिल्हाप्रमुख बाबुराव धुरी यांनी म्हटले आहे.

