*कोकण Express*
*आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून समाजहितासाठी आपण सदैव कार्यरत राहणार..!*
*अनंत पिळणकर; फोंडाघाट कुर्ली वसाहतीतर्फे वाढदिवसानिमित्त सत्कार..*
*कणकवली ः प्रतिनिधी*
आपण समाजाचे काही तरी देणे लागतो या भावनेतून समाजहितासाठी आपण सदैव कार्यरत राहणार आहोत, नवीन कुर्ली वसाहतीतील रहिवाशांबरोबरच जिल्ह्यातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून तसेच पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार व इतर नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण प्रयत्नशील राहू, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष तथा नवीन कुर्ली विकास समितीचे अध्यक्ष अनंत पिळणकर यांनी केले. फोंडाघाट येथील नवीन कुर्ली वसाहत येथे वैशिष्ट्यपूर्ण सामाजिक कामानिमित्त अनंत पिळणकर यांचा सोमवारी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष इर्शाद शेख, राष्ट्रवादीचे प्रांतिक सदस्य नीलेश गोवेकर, रूपेश जाधव, समीर आचरेकर, हरकुळ बुद्रुकचे सरपंच बंडू ठाकूर, जयेश धुमाळे, सागर वारंग, प्रकाश मडवी, प्रकाश सावंत, सेनापती सावंत, योगेश कदम, सुदीप सावत, उत्तम तेली आदींसह मुंबई, कोल्हापूर, सांगली येथील मित्रमंडळी, राष्ट्रवादीसह महाविकास आघाडीतील पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी संदेश पारकर म्हणाले, अनंत पिळणकर हे राजकारणी कमी व समाजकारणी जास्त आहेत. कुर्ली प्रकल्पग्रस्तांचे अनेक प्रश्न, समस्या मार्गी लावण्यासाठी त्यांचे प्रयत्न असतात. त्याचबरोबर फोंडाघाट पंचक्रोशीत कुणाच्याही वेळप्रसंगाला वेळी अवेळी धावणारा हक्काचा माणूस म्हणून त्यांची ओळख आहे. खासदार विनायक राऊत, नाईक, जिल्हाप्रमुख सतीश सावंत व महाविकास आघाडीच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी दूरध्वनीद्वारे अनंत पिळणकर यांना पुढी को शुभेच्छा देत सुयश चिंतीले.