नरडवे हायस्कुलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

नरडवे हायस्कुलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा

*कोकण Express*

*नरडवे हायस्कुलच्या माजी विद्यार्थी स्नेहमेळावा*

*कणकवली ः प्रतिनिधी*

अखिल नरडवे ग्रामोध्दार संघ संचालित नरडवे इंग्लिश स्कूल, नरडवे या हायस्कूल च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्यात १९६३ ते २०२२ पर्यतच्या बॅचचे माजी विद्यार्थी उपस्थित झाले होते.
रविवार २७ नोव्हेंबर रोजी परळ येथील दामोदर नाट्यगृहाच्या परिसरातील सोशल सर्विस लिग हायस्कूल च्या ए. सी. सभागृहात झालेल्या
या मेळाव्यात मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार विजेते बॅडमिंटन खेळाडू प्रदीप गंधे व बजाज इलेक्ट्रिकलस चे जनरल मॅनेजर मुरलीधर नायकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. माजी मुख्याध्यापक मनोहर काजरेकर, नरडवे हायस्कूल शालेय समितीचे चेयरमन दत्तात्रय मुंडले सर, उद्योजक बी.डी.सावंत , अखिल नरडवे ग्रामोद्धार संघ मुंबईचे अध्यक्ष जे. वाय.सावंत, सेक्रेटरी विजय सावंत, कार्यध्यक्ष जी. एन. सावंत, विठोबा राणे, तसेच सर्व पदाधिकारी आणि संचालक मंडळ सदस्य, नरडवे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुरुवातीला दिवंगताना श्रद्धांजली वाहण्यात आली. संघाचे जनरल सेक्रेटरी विजय सावंत यांनी संघाची ध्येय, उद्दीष्ट व आगामी वाटचालीविषयी मार्गदर्शन केले. नरडवे हायस्कूलच्या बहूउद्देशीय सभागृह व वर्ग खोल्यांचे बांधकामासाठी देणग्या दिलेल्या सर्वांचे यावेळी कौतुक व सत्कार करण्यात आले. या प्रस्थावित इमारत बांधण्यामागची पार्श्वभूमी व भविष्यातील गरज विशद करण्यात आली. या हायस्कूल च्या उभारणीमुळे या गावाच्या पंचक्रोशीत झालेला शैक्षणिक बदलांमुळे लोकांची झालेली प्रगती व उन्नती याबाबत चर्चा करण्यात आली.
१९६३-६४ च्या आसपास या शाळेतून एस. एस. सी. झालेले वयस्कर विद्यार्थी आणि २०२१-२२ मध्ये एस. एस. सी. झालेले नुकतेच तारुण्यात आलेले विद्यार्थी असे अनोखे स्नेहसंमेलन दिसून येत होत.
प्रमुख पाहुणे मुरलीधर नायकर यांनी जीवनात शाळेचे महत्त्व सांगून माजी विद्यार्थ्यांकडून शाळेसाठी सहकार्य करण्यासंबधी आवाहन केले.आपल्या शाळेला जीवनात कधीही विसरू नका.असा मोलाचा भावनिक सल्ला दिला. प्रदीपजी गंधे म्हणाले आपण या कार्यक्रमातील माजी विद्यार्थ्यांच्या उत्साहामुळे प्रभावित झालो आहोत तसेच आपल्या वतीने या शाळेसाठी मदत मिळवून देणार असल्याचे सांगितले.
बी.डी. सावंत यांनी सीएसआर च्या माध्यमातून अधिकाधिक निधी मिळवून त्याच्या सहाय्याने शाळेचा तसाच गावाचा कायापालट करण्याबाबत मार्गदर्शन केले. प्राध्यापिका डाॅ. सौ. रूपाली संदीप सावंत यांनी तंत्रज्ञान विषयक शिक्षणाचे महत्त्व सांगून शाळेचे महत्त्व पटवून दिले.
अध्यक्ष जे. वाय. सावंत यांनी आपल्या पूर्वजांनी केलेल्या या महान कार्यात आपण सहभागी व्हा असे कळकळीचे आवाहन केले. देणगीदारांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. देणगीदार बॅचच्या विद्यार्थ्यांना सन्मान चिन्ह देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्र संचालन कृष्णा म्हसकर व गणेश रावराणे या माजी विद्यार्थ्यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!