युवासेनेतर्फे होणार आदित्य ठाकरेंचे जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

युवासेनेतर्फे होणार आदित्य ठाकरेंचे जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर

*कोकण Express*

*युवासेनेतर्फे होणार आदित्य ठाकरेंचे जल्लोषी स्वागत – हरी खोबरेकर*

*मालवण  ःःप्रतिनिधी* 

शिवसेनेतील बंडखोरीनंतर राज्यात निष्ठायात्रा काढणारे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे दि. १ ऑगस्ट रोजी सिंधुदुर्ग दौऱ्यावर येत असून मालवण- कुडाळ विधानसभा मतदार संघातील युवासेनेतर्फे आदित्य ठाकरे यांचे कुडाळ शिवसेना शाखा येथे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. सर्व शिवसैनिक शिवसेनेशी एकनिष्ठ व ठाकरे यांच्या सोबत असल्याचा विश्वास यावेळी आदित्य ठाकरे यांना देण्यात येणार आहे अशी माहिती तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील निष्ठा यात्रेच्या पार्श्वभूमीवर ठाकरे यांच्या स्वागतासाठी रविवारी सकाळी मालवण शिवसेना शाखा येथे युवासेनेची नियोजन बैठक पार पडली. यावेळी तालुकाप्रमुख हरी खोबरेकर, बबन शिंदे, शहरप्रमुख बाबी जोगी, युवासेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, युवासेना तालुकाप्रमुख मंदार गावडे, उपतालुकाप्रमुख अमित भोगले, युवासेना शहरप्रमुख मंदार ओरसकर, उपशहर प्रमुख सिद्धेश मांजरेकर शिला गिरकर, जान्हवी कुमठेकर, दीपा शिंदे, निनाक्षी मेतर, प्रसाद आडवणकर, संमेश परब, अमेय देसाई, अनंत पाटकर, दत्ता पोईपकर आदी व इतर उपस्थित होते.

यावेळी हरी खोबरेकर म्हणाले, शिवसेनेतील पडझडी नंतर युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शिवसैनिकांशी संवाद साधण्यासाठी निष्ठा यात्रा काढली आहे. कुडाळ येथे आदित्य ठाकरे यांचे युवासेना, शिवसेना पदाधिकारी, महिला पदाधिकारी यांच्यातर्फे जल्लोषी स्वागत करण्यात येणार आहे. आम्ही शिवसैनिक शिवसेनेशी निष्ठा बाळगून असून शिवसेनेची घोडदौड कायम सुरू ठेवू, शिवसेना सांभाळण्याची जबाबदारी प्रत्येक शिवसैनिकावर आहे, शिवसेनेसाठी लढण्यासाठी आम्ही सदैव तयार आहोत असा विश्वास आम्ही आदित्य ठाकरे यांना देणार आहोत, असेही हरी खोबरेकर म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!