बुरंबावडे येथे निसरड गुरुजी यांचा सेवापुर्ती गौरव

बुरंबावडे येथे निसरड गुरुजी यांचा सेवापुर्ती गौरव

*कोकण Express*

*बुरंबावडे येथे निसरड गुरुजी यांचा सेवापुर्ती गौरव*

*कासार्डे:संजय भोसले*

बुरंबावडे येथे प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असताना सेवानिवृत्त झालेले हरिभाऊ निसरड गुरुजी यांचा बुरंबावडे शालेय समिती व बुरंबावडे ग्रामविकास मंडळ तसेच सर्व ग्रामस्थ यांच्यावतीने सेवापूर्ती गौरव समारंभ नुकताच बुरंबावडे जि.प.प्राथमिक शाळा येथे मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला.

मुख्याध्यापक हरिभाऊ निसरड यांनी तीस वर्षे शैक्षणिक क्षेत्रात महान योगदान दिलेले आहे. विनम्र, सालस, मनमिळाऊ स्वभाव, निस्पृह कर्मतत्परता, अनुभव संपन्न आणि अभ्यासू व्यक्तिमत्व असणारे निसरड गुरुजी यांनी बुरंबावडे शाळेत कांबळे गुरुजी, गोसावी बाई, राणे बाई, पेडणेकर गुरुजी, कोळेकर गुरुजी, लटपटे गुरुजी इत्यादी सर्व सहकारी शिक्षकांच्या सहकार्याने अतिशय उत्तम शैक्षणिक कार्य केलेले आहे. त्यांच्या कार्याने प्रभावित झालेल्या बुरंबावडे येथील ग्रामस्थांनी त्यांचा हृद्य सत्कार घडवून आणला. यासमयी विद्यार्थी, शिक्षक, ग्रामस्थ, शालेय व्यवस्थापन समिती तसेच बुरंबावडे ग्रामविकास मंडळ( ग्रामीण व मुंबई शाखा) यांनी  निसरड गुरुजी यांना आदरपूर्वक सदिच्छा भेटवस्तू प्रदान करून कृतज्ञता अभिव्यक्त केली. निसरड गुरुजी यांनीही उपस्थितांना स्नेहपूर्वक भेटवस्तू प्रदान करून ऋणानुबंध अभिव्यक्त केले.

याप्रसंगी आपल्या वक्तव्यात फणसगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख शुभांगी सावंत यांनी निसरड गुरुजी यांच्या सर्वांगीण ज्ञान कौशल्याची आणि कार्याची प्रशंसा केली. बुरंबावडे शाळेत मुख्याध्यापक पद सांभाळत निसरड गुरुजी यांनी शाळेच्या विकासात मोठे योगदान दिलेले असल्याचे त्यांनी प्रतिपादन केले.सुसज्ज क्रीडा मैदान, गांडूळ खत प्रकल्प, बालोद्यान, कवी कट्टा, शाळेची इमारत, वर्गखोल्यां दुरुस्ती, शाळेचे सुशोभीकरण व रंगरंगोटी, लोकवर्गणीतून जेवणाची खोली अशा अनेक शैक्षणिक, सामाजिक सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक गरजा यांची बऱ्यापैकी पूर्तता निसरड गुरुजींनी आपल्या कारकीर्दीत केली असल्याचे मनोगत अध्यापिका स्नेहलता राणे यांनी या गौरव समारंभात अभिव्यक्त केले. संदीप कोळेकर गुरुजी यांनी आपल्या मनोगतात म्हटले की, निसरड गुरुजी हे आपणास लाभलेले विनम्र आणि सेवाभावी असे मार्गदर्शक आहेत ज्यांनी २०१५ सालात बुरंबावडे शाळेचे नाव जिल्हास्तरावर  झळकविले. जिल्हास्तरीय स्पर्धेतून विद्यार्थ्यांकडून अतुल यश मिळवून जिल्हास्तरीय शालेय इतिहासात  बुरंबावड्याच्या प्राथमिक शाळेचे नाव गोंदविले आहे. शैक्षणिक व शालेय आस्थापना याबाबत असलेले त्यांचे ज्ञान आणि कृतिशील कार्यतत्परता या बाबींचा बुरंबावडे शाळेच्या विकासात अलौकिक लाभ झालेला आहे. आपल्या वक्तव्यात विष्णु लटपटे गुरुजी म्हणाले की, निसरड गुरुजींचे आपणास उत्तम मार्गदर्शन आणि सहकार्य मिळत गेले. विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी करावयाच्या कामकाजात वरिष्ठ म्हणून त्यांनी आम्हाला सदैव स्वातंत्र्य, मार्गदर्शन आणि प्रेरणा दिल्यामुळे विद्यार्थी घडविण्यात आम्हांस स्वानंद मिळत आला. बुरंबावडे शाळेचे नावही शैक्षणिक क्षेत्रात प्रख्यात होऊन झळकले. या सगळ्याचे श्रेय निसरड गुरुजी यांना जाते.

याप्रसंगी बुरंबावडे ग्रामविकास मंडळाचे माजी अध्यक्ष उदय दुदवडकर यांनी  निसरड गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेच्या सर्व आजी व माजी शिक्षकांनी बुरंबावडे गावातील विद्यार्थी घडविण्यासाठी प्रामाणिक आणि खडतर योगदान दिलेले असल्याचे सांगितले. पुढे ते म्हणाले की, निसरड गुरुजी आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांनी कला, क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात बुरंबावडे सारख्या खेड्यातील विद्यार्थ्यांना उत्तम सराव करून घेऊन, यथोचित मार्गदर्शन देऊन जिल्हा स्तरावर तसेच राज्यस्तरावर नावारूपाला आणले आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक स्तरावर बुरंबावडे शाळेतील विद्यार्थी उत्तम गुण मिळवून प्रथम श्रेणीत येवून गौरवप्राप्त झालेले आहेत. याचे श्रेय निसरड गुरुजी आणि सर्व शिक्षकांना असल्याचे सांगून उदय दुदवडकर यांनी ग्रामस्थांच्यावतीने सर्व शिक्षकांचे ऋणानुबंध अभिव्यक्त करीत निसरड गुरुजी यांना तसेच भावी मुख्याध्यापिका स्नेहल राणे यांना आणि त्यांच्या सर्व सहकारी शिक्षकांना भावी वाटचालीसाठी शुुुुभेच्छा दिल्या. बुरंबावडे ग्रामपंचायत उपसरपंच उदय पारकर यांनी निसरड गुरुजी यांचे कामकाज समाधान कारक असल्याचे  आणि सर्व शिक्षकांचा शालेय व्यवस्थापनातील सहयोग हा स्तुत्य असल्याचेेे प्रतिपादन केले. शालेय समितीचे माजी अध्यक्ष संदेश मांजरेकर यांनी निसरड गुरुजी आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्या कार्याबाबत समाधान व्यक्त करून सर्वांना शुभेच्छा दिल्या. शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत बुरंबावडे ग्रामविकास मंडळाचे सचिव सुरेश मांजरेकर यांनीही आपल्या वक्तव्यात निसरड गुरुजींच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांनी बुरंबावडेे ग्रामविकास मंडळाच्या वतीने गुरुजी आणि त्यांचे सहकारी शिक्षक यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करीत शुभेच्छा दिल्या. शालेय व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष राजेंद्र दुदवडकर याांनी निसरड गुरुजी आणि त्यांचे सहकारी शिक्षक या सर्वांच्या कार्याची प्रशंसा केली. सर्व शिक्षकांंप्रती त्यांनी कृतज्ञता अभिव्यक्त करीत निसरड गुरुजी यांना सदिच्छा दिल्या. याप्रसंगी बुरंबावडे ग्रामपंचायत सदस्य गोपाळ जाधव आणि रिद्धि दुदवडकर यांनी निसरड गुरुजी यांच्या कार्याबाबत आदरयुक्त वक्तव्ये करीत त्यांना शुभेच्छा दिल्या.मनिषा शिंगे आणि पल्लवी शिंगे या पालकांनी निसरड गुरुजी हे पालकांशी अतिशय सामंजस्याने आणि समन्वयाने वागत असल्याबद्दल त्यांच्याप्रती आपल्या सद्भावना व्यक्त केल्या तसेच या शाळांमधून आपल्या मुलांना उत्तम शिक्षण आणि सर्वांगीण मार्गदर्शन मिळाल्याबाबत त्यांनी सर्व शिक्षकांप्रती कृतज्ञता व्यक्त केली. आपल्या अध्यक्षीय भाषणात  शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संदीप बांदिवडेकर यांनी निसरड गुरुजींच्या कार्याबाबत गौरवोद्गार काढले. निसरड गुरुजींच्या मार्गदर्शनाने आणि कार्यतत्परतेमुळे आम्हाला शालेय विकासासाठी उत्तम पैकी निधी उपलब्ध करण्यात सहकार्य मिळाले त्यामुळे शालेय व्यवस्थापन समितीला शालेय व्यवस्थापन साधण्यात उत्तम यश लाभल्याचे  त्यांनी सांगितले. गुरुजींचे आभार मानत त्यांच्या भावी आयुष्यासाठी आणि कार्यसिद्धीसाठी संदीप बांदिवडेकर यांनी सदिच्छा व्यक्त केल्या.

सदर गौरव समारंभात अरुण पवार, कुणाल रंगारी, अमोल कांबळे आदी शिक्षक तसेच निलेश हिर्लेकर, राजाराम साळवी, शशिकांत खांडेकर, सदानंद कांबळे, संदीप बंदरकर, सृष्टी बांदिवडेकर, प्रमिला बंदरकर, विजया (सुरेखा) नार्वेकर, सुचिष्मा बांदिवडेकर इत्यादी ग्रामस्थ उपस्थित होते. समारंभाचे प्रास्ताविक संदीप कोळेकर गुरुजी यांनी केले तर आभार प्रकटन आणि समारोप विष्णु लटपटे गुरुजी यांनी पार पाडले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!