महामार्गालगतच्या वृक्षलागवडीचा प्रश्न ऐरणीवर राजेश जाधव (तळेरे) यांनी ५ जून पर्यावरण दिनी आमरण उपोषणाचा दिला इशारा

महामार्गालगतच्या वृक्षलागवडीचा प्रश्न ऐरणीवर राजेश जाधव (तळेरे) यांनी ५ जून पर्यावरण दिनी आमरण उपोषणाचा दिला इशारा

*कोकण Express*

*महामार्गालगतच्या वृक्षलागवडीचा प्रश्न ऐरणीवर राजेश जाधव (तळेरे) यांनी ५ जून पर्यावरण दिनी आमरण उपोषणाचा दिला इशारा*

*ठेकेदाराच्या तकलादू वृक्षलागवडीने केली शासनाच्या डोळ्यात धूळफेक तर कोकणवासीयांची घोर निराशा*

*कासार्डे:संजय भोसले*

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या दुतर्फा असलेली झाडे चौपदरीकरणात तोडण्यात आली.त्या झाडांच्या जागी नव्याने झाडांची लागवड करण्याच्या कामात संबंधित ठेकेदाराकडून महामार्गाच्या दुतर्फा योग्य नियोजनपूर्वक वृक्षसंपदेची पुनर्लागवड करणे व त्यांचे संवर्धन करणे आवश्यक होते.परंतु त्या कामाचे तीनतेरा वाजल्याचे उघड झाले आहे.या प्रश्नाबाबत नियमोचित त्वरित कार्यवाही होण्याच्या दृष्टिकोनातून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण,कोकण विभागाच्या अधीक्षक अभियंता यांची सामाजिक कार्यकर्ते तथा निसर्ग मित्रपरिवार या पर्यावरण प्रेमी संस्थेचे सचिव तथा ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कणकवलीत तालुका उपाध्यक्ष राजेश जाधव यांनी कोकण भवन, नवी मुंबई येथे भेट घेऊन त्यांना मागण्यांचे लेखी निवेदन सादर केले आहे.तसेच सदर मागण्यांच्या अनुषंगाने दि.५ जून २०२२ या पर्यावरण दिनाच्या आधी याबाबत उचित कार्यवाही न झाल्यास आमरण उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वनसंज्ञेखाली समाविष्ट जमिनीचे संपादन करून त्यामधील वृक्षसंपदेची मोठया प्रमाणावर तोड करण्यात आलेली आहे.त्यामुळे जिल्ह्यातील निसर्ग व पर्यावरणाची अपरिमित अशी हानी झालेली आहे.सद्यस्थितीत मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरणाचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कामकाज हे जवळपास पूर्णत्वास गेलेले आहे.अशा परिस्थितीत महामार्गाच्या दुतर्फा केवळ ‘आम्ही झाडे लावली’ असा दिखावा संबंधितांकडून निर्माण करण्यात आलेला आहे.परंतु प्रत्यक्षात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यावरणाचा विचार करून त्याप्रमाणे वड,पिंपळ, उंबर, आंबा, काजू,फणस, कोकम,जांभुळ इ.वृक्षांच्या रोपांची लागवड करणे आवश्यक होते.परंतु तसे झालेले दिसून येत नाही.

महामार्गाच्या दुतर्फा काही ठिकाणी ज्या वृक्षांची रोपे संबंधितांकडून लागवड करण्यात आलेली आहेत, ती पावसाळ्याच्या सुरुवातीलाच लावणे आवश्यक होते,परंतू ती झाडे पावसाळ्यात न लावता ऐन उन्हाळ्यात लावण्यात आली.सदरची रोपे लावताना त्या प्रत्येक रोपाचा भविष्यातील शाखा विस्तार लक्षात घेऊन लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक दोन रोपांमधील आवश्यक ते योग्य अंतर राखणे व भविष्यात महामार्गाच्या संभाव्य सहा पदरीकरणाचा विचार करून महामार्गाच्या किनारपट्टीपासून लागवड करण्यात आलेल्या प्रत्येक रोपापर्यंतचे आवश्यक ते योग्य अंतर राखणे गरजेचे होते.तर काही ठिकाणी साइट पट्टीच्या कडेलाच झाडे लावण्यात आलेली आहेत.सदर लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रोपांना वेळोवेळी आवश्यक त्या प्रमाणात पुरेसे पाणी देणे अत्यंत गरजेचे होते.तसेच लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रोपांना उन्हाची झळ बसू नये म्हणून त्यांच्या सभोवती काठयांच्या सहाय्याने गुंडाळण्यात आलेले ग्रीन नेट कापड नैसर्गिक वाऱ्यापुढे तग धरू शकेल व लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रोपांना वाढीसाठी पुरेशी सावली देऊ शकेल याची पुरेशी दक्षता घेणे आवश्यक होते.त्याचबरोबर पावसाळ्यानंतर झाडांच्या मुळातील गवत न काढता तसेच ठेवल्यामुळे ते गवत सुकल्यानंतर बऱ्याच ठिकाणी आगीच्या वणव्यामुळे असंख्य झाडे ग्रीननेटसह जाळून खाक झालेली आहेत.मेलेल्या झाडांच्या जागेवरती दुसरी पर्यायी झाडे लावणे अत्यंत गरजेचे असतांना देखील त्याकडेही संबधीत ठेकेदारांने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे.यापैकी एक देखील बाब नियोजनपूर्वक संबंधितांकडून करण्यात आलेली नाही.त्यामुळे लागवड करण्यात आलेल्या वृक्षांची रोपे पाण्याअभावी कोमेजून व पूर्णतः सुकून गेली असून त्यामुळे शासनाच्या (पर्यायाने जनतेच्या) निधीचा गैरवापर व अपव्यय संबंधितांकडून झालेला स्पष्ट निदर्शनास येत आहे.

यापूर्वी महामार्गाच्या दुतर्फा असलेली निसर्गरम्य वृक्ष संपदा अबाधित रहावी यासाठी महामार्गावरचे काम सुरू होण्यापूर्वी तात्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी वृक्षतोड करण्यापूर्वी तोडल्या जाणाऱ्या झाडांच्या चौपट नव्याने वृक्ष लागवड करण्याची अट घालून नंतरच वृक्षतोडीस परवानगी दिली होती.तसेच केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनी देखील महामार्गाच्या भूमीपूजन प्रसंगी कोकणातील स्थानिक फळ झाडे रस्त्याच्या दुतर्फा लावून हरित पट्टा निर्माण करणार असल्याची घोषणा केली होती.मात्र संबंधित ठेकेदारांने या सगळ्या गोष्टींना हरताळ फासल्याचे चित्र सध्या पहावयास मिळत आहे.यामध्ये जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के.मंजुलक्ष्मी यांनी वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे.

याबाबत संबंधितांवर जबाबदारी निश्चित करून त्यांचेकडून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पर्यावरणास पूरक अशा वड, पिंपळ, उंबर, आंबा, काजू,फणस,जांभूळ,कोकम इ.वृक्षांच्या रोपांची लागवड योग्य नियोजनपूर्वक व दक्षतापूर्वक येत्या ५ जून २०२२ या पर्यावरण दिनाच्या दिवशी संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकाचवेळी करून घेण्यात यावी व सदर लागवड करण्यात आलेल्या वृक्षांच्या रोपांच्या जतन व संवर्धनाची पुढील किमान तीन वर्षांची जबाबदारी संबंधितांवर सोपविण्यात यावी.तसेच या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियमोचित कार्यवाहीचा लेखी अहवाल येत्या ५ जून २०२२ या पर्यावरण दिनाच्या पूर्वी प्राप्त व्हावा.असे न झाल्यास ५ जून २०२२ या पर्यावरण दिवशीच सकाळी १० वाजल्यापासून तळेरे ग्रामपंचायत कार्यालयाच्या परिसरात आमरण उपोषण करणार असल्याचा इशारा राजेश जाधव यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या कोकण विभागास दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!