*कोकण Express*
*तळेरे येथील एटीएम सुविधांमध्ये असुविधा*
*सर्व बॅंकांनी एटीएममध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध करून देण्याची राजेश जाधव यांची मागणी*
*कासार्डे : संजय भोसले*
तळेरे येथील बॅंकांच्या एटीएम सुविधांमध्ये वारंवार असुविधा निर्माण होत असून पुरेशी रक्कम उपलब्ध होत नसल्याने तसेच सेवा खंडीत होत असल्याने ग्राहकांची खूप गैरसोय होत आहे.तरी सर्व बॅंकांनी एटीएममध्ये पुरेशी रक्कम उपलब्ध करून देण्याची आग्रही मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी केली आहे.
तळेरे हे एक विकसनशील गाव असून येथे व्यापारी बाजारपेठेसह अनेक नागरी सोई – सुविधा उपलब्ध आहेत. त्यामुळे तळेरे हे दशक्रोशीचे एक महत्वपूर्ण व केंद्र ठिकाण बनले असून येथे होणारी आर्थिक उलाढाल देखील मोठ्या प्रमाणावरील आहे. अशा परिस्थितीत तळेरे येथे वित्त सेवा पुरविणाऱ्या विविध बँका व पतसंस्था यांचेपैकी बँक ऑफ महाराष्ट्र, बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया अशा तीन राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम सुविधा सुरू आहे.
परंतू बँक ऑफ महाराष्ट्र मधील एटीएम सुविधा ही बँकेच्या शाखा कार्यालयातच सुरू असल्याने बँकेच्या कामकाजाच्या वेळेपूर्वी अथवा नंतर सदर एटीएम सुविधेचा लाभ वापरकर्त्यांना घेता येत नाही. तसेच बँक ऑफ इंडिया व स्टेट बँक ऑफ इंडिया अशा अन्य दोन राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएम सुविधा बँक शाखा कार्यालयाच्या व्यतिरिक्त अन्य स्वतंत्र जागेत सुरू आहेत. परंतु तिथे देखील ‘पैसे उपलब्ध नसणे, तांत्रिक अडचण असणे’ अशा सततच्या विविध समस्या असतात. त्यामुळे बहुतांश वेळा सदर एटीएम सुविधांचा लाभ घेता येत नाही. तसेच सदर एटीएम सुविधा असलेल्या ठिकाणी वीज पुरवठा खंडित झाल्यावर पर्यायी वीज पुरवठ्याची सोय नसल्याने एटीएम मशीनवर आर्थिक व्यवहार सुरू असतानाच एटीएम मशीन मध्येच बंद पडून सुरू असलेला आर्थिक व्यवहार खंडित होतो व त्या ठिकाणी काळोखात देखील चाचपडावे लागते.सदर एटीएम सुविधांकरीता सुरक्षा रक्षकांची अथवा सहाय्यकांची सेवा उपलब्ध नाही. त्यामुळे सदर एटीएम सुविधांचा वापर करताना वापरकर्त्यांच्या बाबतीत एखादा अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येणारी नाही.असे झाल्यास त्याबाबतची जबाबदारी कोण घेणार? तरी या सर्व बाबींच्या अनुषंगाने संबंधित राष्ट्रीयकृत बँकांनी वेळीच लक्ष देऊन समस्यांचे निवारण करावे व स्थानिक लोकप्रतिनिधींनी याबाबत आवश्यक तो पाठपुरावा करावा अशी मागणी ह्युमन राईट्स असोसिएशन फॉर प्रोटेकशनचे कणकवली तालुका उपाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते राजेश दिलीपकुमार जाधव यांनी केली आहे.


