*कोकण Express*
*नोकरी मागणारे नको, नोक-या देणारे बना! : डाॅ. अनिल नेरूरकर*
*कासार्डे: संजय भोसले*
भविष्याचा वेध घेऊन आतापासून नियोजन केले तर तुम्हाला यशस्वी होण्यापासून कोणी रोखू शकणार नाही, नोकरी मागणारे बनू नका, नोक-या देणारे बना, असे प्रतिपादन अमेरिकास्थित डाॅ. अनिल नेरूरकर यांनी केले.
सुनिता एज्युकेशनल ट्रस्ट आणि श्रावणी कंप्यूटर्स यांच्या संयुक्त विद्यमाने कासार्डे येथे अलीकडेच ‘वेध भविष्याचा’ हे दोन दिवसीय निवासी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी सुनिता एज्युकेशन ट्रस्टच्या मानसी वाळवी यांची विशेष उपस्थिती होती.
या शिबिरात डाॅ. नेरूरकर यांच्यासह कॅनडा येथील डाॅ. स्मिता आकळे आणि डाॅ. हर्षवर्धन काळे, विशाखापट्टणम येथील श्री. संपत, वैभववाडीचे गटविकास अधिकारी जयप्रकाश परब, देवगड येथील उद्योजक अजीत शिरोडकर, नडगिवे इंग्लिश मिडीयम स्कूलचे सीईओ राजेंद्र भोरे, विधी मुद्राळे आणि प्रमोद कोयंडे यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले.
जयप्रकाश परब यांनी शिक्षण घेतानाचा संघर्ष ते गटविकास अधिकारी होईपर्यंतचा प्रवास कथन करतानाच स्पर्धा परीक्षांचे आव्हान पेलण्यासाठी काय करावे, याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले.
डाॅ. स्मिता आकळे यांनी पालकांची भूमिका आणि विद्यार्थ्यांची कर्तव्ये या विषयावर मार्गदर्शन केले. डाॅ. हर्षवर्धन काळे यांनी संवाद कौशल्य कसे प्राप्त करावे, हे उदाहरणासह स्पष्ट केले. विधी मुद्राळे यांनी वेदिक गणित तर प्रमोद कोयंडे यांनी अभिनयातील रस या विषयावर मार्गदर्शन केले. ६५ विद्यार्थ्यांनी या शिबिराचा लाभ घेतला.
श्रावणी कम्प्युटर्सच्या संचालिका श्रावणी मदभावे यांनी सर्वांचे आभार मानले.

