ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या जिल्हा संघटनेने केली माणुसकी धर्माची जपणूक

ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या जिल्हा संघटनेने केली माणुसकी धर्माची जपणूक

*कोकण Express*

*ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या जिल्हा संघटनेने केली माणुसकी धर्माची जपणूक*

*असलदे उगवतवाडी येथील भूमिहीन वयोवृद्ध जेष्ठ नागरीक भिकाजी धोंडू हरमळकर यांना मिळवून दिला सविताश्रमाचा आधार*

*कासार्डे : संजय भोसले*

कणकवली तालुक्यातील असलदे (उगवतवाडी) येथील भूमिहीन वयोवृद्ध, जेष्ठ नागरीक भिकाजी धोंडू हरमळकर (वय ८३) यांना आज ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या जिल्हा संघटनेने माणुसकी धर्माची जपणूक केली.या संघटनेने तातडीने या वृत्ताची दखल घेऊन वयोवृद्ध जेष्ठ नागरीक भिकाजी धोंडू हरमळकर यांना अणाव येथील सविताश्रमात नेऊन दाखल करून त्यांची सर्व व्यवस्था केली.

असलदे उगवतवाडी येथील भूमिहीन वयोवृद्ध जेष्ठ नागरीक भिकाजी धोंडू हरमळकर यांच्या मालकीचे एकच असलेले असलदे उगवतवाडी येथील सहा गुंठे जागेसह जुने राहते घर त्यांच्या नातेवाईकांनी विकून त्यांना बेघर केल्याची खबर ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक आणि जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर यांना मिळाली होती.

भूमिहीन वयोवृद्ध जेष्ठ नागरीक भिकाजी धोंडू हरमळकर यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्यांच्या पश्चात दोन विवाहित मुली, त्यापैकी एकीचे निधन झाले तर दुसरी मुलगी मनोरुग्ण असल्याने वयोवृद्ध श्री.हरमळकर यांच्या आयुष्याची परवड सुरू झाली होती.त्यातच त्यांचे राहते घर व जमीन नातेवाईकांनी विकून त्यांना बेघर केल्याची तक्रार तहसीलदार कणकवली आणि कणकवली पोलिस स्टेशनमध्ये केल्याचे खुद्द भिकाजी धोंडू हरमळकर यांनी दिल्याचे समजते.त्यानंतर गेले सहा दिवस नांदगाव येथील एका दुकानाच्या ओसरीला राहत होते.दुकानदाराने त्यांची हकिगत समजल्यावरती राहण्यास आसरा दिला.तर सामाजिक कार्यकर्ते बाळा मोर्ये यांनी आंघोळ,चहा,नाष्टा,जेवण याची सोय करून थोडा हातभार लावला.

सदरच्या वृत्ताची खबर मिळताच मंगळवारी ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन सिंधुदुर्ग या संघटनेचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक,जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर,जिल्हा प्रतिनिधी संजय खानविलकर यांनी नांदगाव येथे जाऊन त्यांची सगळी कैफियत जाणून घेऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली.मात्र आपल्याला कोणीच वाली नसल्याने माझी सुरक्षित स्थळी राहण्याची व्यवस्था करा अशी हात जोडून वारंवार विनंती करीत होते.यावेळी बाळा मोर्ये उपस्थित होते.अखेर त्यांच्याशी चर्चा करून तसेच कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर आणि सविताश्रमचे संदिप परब यांच्याशी फोनवरून सविस्तर बोलणे झाले.बुधवारी दुपारी कणकवली पोलीस स्टेशनला आणण्याचे निश्चित करण्यात आले.

त्या प्रमाने सकाळी ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे संतोष नाईक,जिल्हा निरिक्षक मनोज तोरसकर,जिल्हा प्रतिनिधी संजय खानविलकर,कणकवली तालुका अध्यक्ष हनिफभाई पिरखान यांची टिम नांदगाव येथे दाखल झाली.तसेच सामाजिक कार्यकर्ते बाळा मोर्ये उपस्थित होते.त्यांनी श्री.हरमळकर यांची कायमस्वरूपी राहण्याची व निवाऱ्याची सोय व्हावी यादृष्टीने पाऊले उचलून ह्यूमन राईटच्या टिमने त्यांना पोलिस स्टेशन कणकवली येथे नेऊन सर्व रित्सर प्रक्रिया पूर्ण करुन घेतली.यासाठी कणकवलीचे पोलीस निरीक्षक सचिन हुंदळेकर यांनी विशेष सहकार्य केले.

त्यानंतर ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनच्या पदाधिकाऱ्यांनी स्वत: निराधार श्री.हरमळकर यांना घेऊन अणाव येथील सविताश्रमात सुखरूप नेऊन सुपूर्द केले.सविताश्रमचे संदिप परब यांनी त्यांची सर्व व्यवस्था करण्याची ग्वाही दिली.

माणुसकी धर्मातून एका वृध्द निराधार व्यक्तीला आधार मिळवून दिला आणि ते भाग्य आपल्या वाढदिवसा दिवशी लाभले यासारखे दुसरे पुण्यकर्म नाही आजचा दिवस खऱ्या अर्थाने चांगल्या कार्यासाठी सार्थकी लागला अशी भावना ह्यूमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शनचे जिल्हाध्यक्ष संतोष नाईक यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!