*कोकण Express*
*डोंबिवलीत पार पडला गानसरस्वती किशोरीताई आमोणकर स्मृती महोत्सव !*
*कासार्डे ः संजय भोसले*
डोंबिवलीत दर वर्षी कुलकर्णी परिवार गानसरस्वती किशोरी आमोणकर मोहत्सव २०१७ पासून आयोजित करतात. यावेळी तब्बल दोन वर्षांनी शनिवारी दि.९ रोजी हा महोत्स खूप देखण्या पध्दतीने पार पडला. या कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात “कलर्स ऑफ व्हायलीन” हा वेगवेगळ्या संगीताचा अविष्कार असणारा एक अनोखा प्रयोग रायकर व्हायोलिन अकॅडमीच्या विद्यार्थ्यांनी व्हायोलिन वादक पं.मिलिंद रायकर सरांच्या मार्गदर्शनाखाली सादर केला.
सरांना तब्बल २१ एक वर्षे किशोरीताईंची तालीम मिळाली होती.
*किशोरीताई आपले गाणे सादर करताना अनेकदा कॉर्ड्सचा पण* प्रयोग करायच्या आणि मिलिंद सरांनी पण तसे कधीतरी करावे असेही सुचवायच्या.एकदा एनसीपीएला फ्रेंच कलाकारांसोबत ताईंनी म्हारो प्रणाम.. हे भजन गाताना या तऱ्हेचा प्रयोग केला होता.
यावेळी डोबिवलीच्या कार्यक्रमात सरांनी तो प्रयोग स्मरणात ठेऊन आपल्या विद्यार्थ्यांकडून त्या तऱ्हेच्या हार्मनीचा संयत पणे वापर करत बँकग्राउंड संगीत तयार केले आणि यज्ञेशने व्हायोलिन वर *म्हारो प्रणाम सादर केले तेव्हा रसिकांच्या अंगावर अंगावर शहारा उमटला.ही रचना करताना सरांनी ज्या तऱ्हेचा विचार मांडण्याचा प्रयोग केला तो लोकांना कमालीचा आवडला आणि रसिकांच्या टाळ्यांच्या अगदी गजर झाला. सरांच्या सगळ्या विद्यार्थ्यांनी मिळालेल्या संधीचा सुयोग्य वापर करत फारच सुरेल वाजवले.श्वेता, सिध्दार्थ, कनका,शुभदा,मेधा या आणि इतर सर्व विद्यार्थ्यांनी घेतलेली मेहनत त्यांच्या वादनातून जाणवत होती.
दुसऱ्या सत्रात स्वरप्रज्ञ पंडित मिलिंद रायकरांनी आपल्या व्हायोलिन वादनाने उपस्थित रसिकांना मंत्रमुग्ध करून टाकले. त्यांना डोंबिवलीतील प्रसिद्ध तबला वादक पंडित विश्वनाथ शिरोडकर यांनी अप्रतिम अशी संयत साथ दिल्याने कार्यक्रम एका वेगळ्या उंचीवर गेला. सरांनी वाजवलेला बागेश्री रसिकांच्या खूप दिवस स्मरणात राहील हे नक्की. सरांनी घेतलेल्या काही जागा इतक्या अप्रतिम आणि सुरेल होत्या की रसिकांना ताईंच्या बागेश्रीची आठवण व्हावी.नंतर रसिकांच्या आग्रहास्तव आणि दुसऱ्या दिवशीच्या रामनवमीचे औचित्य साधत सरांनी- पायोजी मैने रामरतन धन पायो.. हे भजन सादर केले तेव्हा रसिकांची अगदी घेता किती घेशील दो करांनी अशीच अवस्था झाली.

तब्बल दोन वर्षांंनी घराबाहेर पडलेले जून्या पठडीतील प्रसिद्ध गायक पंडित मधुबुवा जोशींनी संपूर्ण कार्यक्रमाचा सहकुटुंब मनःपूत आनंद घेतला.
डोंबिवलीतील प्रसिद्ध संवादीनी वादीका सौ.सीमाताई शिरोडकर, तबलजी निषाद पवार , अनेक प्रतिष्ठित आणि मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढली.
कुलकर्णी परिवाराने उपस्थित कलावंतआणि रसिकांचे मनापासून आभार मानले. यावेळी इंद्रधनुष फाउंडेशनने आणि इतर अनेकांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सढळ हाताने मदत केली होती.

