कासार्डे—तळेरे परिसराला वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपले ,लाखोंची हानीही झाली

कासार्डे—तळेरे परिसराला वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपले ,लाखोंची हानीही झाली

*कोकण Express*

*कासार्डे—तळेरे परिसराला वळवाच्या पावसाने अक्षरशः झोडपले ,लाखोंची हानीही झाली*

*कासार्डे   ः संजय भोसले*

दिवसभराच्या उष्णतेमुळे संध्याकाळी अचानक आलेल्या वळवाच्या पावसाने कासार्डे —तळेरे परिसरात धुमाकूळ घातला असून लाखोंची हानी झाली आहे. तर अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटनाही घडलेल्या आहेत.
गेल्या काही दिवसांमध्ये वातावरणात अचानक बदल होऊन जिल्ह्यात उष्णतेची लाट पसरली आहे. त्याचा परिणाम होऊन मंगळवारी संध्याकाळी जोरदार वाऱ्यासह विजांचा कडकडाट होऊन पावसाला सुरुवात झाली .या वाहणाऱ्या वाऱ्याचा जोर इतका होता की मुंबई-गोवा हायवे लगत असलेल्या कासार्डे तिठ्याजवळचे महादेव मार्बल या दुकानदाराने अंदाजे 50 ते 60 फूट लांब आणि 25 ते 30 फूट रुंद केलेल्या पोर्च वरील पत्रे उडून पलीकडील लाकूड वखारीच्या अंगणात जाऊन पडले, तर काही पत्रे झाडावरच अडकून राहीले होते. सुदैवाने या लाकडाच्या चक्कीवर कोणी कामगार काम करत नसल्याने मोठा अनर्थ टळला.
कासार्डे वाडी — वस्तीतील जाणकार सांगतात की हा वारा इतका जोरदार होता की परवा झालेल्या तोक्ते वादळाला ही लाजवेल . सोबत विजांच्या कडकडाटाने क्षणोक्षणी जमीन प्रकाशून जात होती तर मेघांचा गडगडाटानी कांनठळ्या बसण्याची वेळ आली होती. त्यामुळे सर्व जनजीवन विस्कळीत झाले होते .या वळवाच्या पावसाचा सर्वात जास्त फटका कोणाला बसला असेल तर तो म्हणजे या परिसरामध्ये काम करणाऱ्या खाण कामगारांना.
विशेष म्हणजे जे खाण कामगार मग ते चीरे खाण असो अथवा मायनिंग सिलीकाची असो. हे लोक आपली घरं पालापाचोळा अथवा प्लास्टिकचा कागद वापरून झोपडीवजाच तयार करतात. आणि त्यामध्ये आपला छोटेखानी संसार थाटतात .मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसामुळे त्यांची दैना झाली असून नुकतेच मंगळवारच्या तळेरे येथील बाजारातून आठवडाभरासाठी आणलेले राशन व इतर गरजेच्या वस्तू पावसात भिजून चिंब झाल्या होत्या. तर रात्रीच्या विश्रांतीचे ही वांदे होऊन बसले होते.
या परिसरात झाडे उन्मळून पडल्याने त्याचा परिणाम विजेच्या तारा वरती झाला. सहाजिकच कडकडणाऱ्या वीजांबरोबर सर्व ठिकाणची बत्ती गुल झाली .तर काही ठिकाणी विजेचा लपंडाव सुरू होता. हा वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठीची कसरत वीज मंडळांच्या कर्मचाऱ्यांना करावी लागणार असून ,त्या दृष्टीने ते प्रयत्नशील आहेत .पावसाने काही प्रमाणात हवेत गारवा निर्माण केला असला तरी नुकसान ही मोठे झालेले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!