मडुरा पूल मंजुरीत माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांचाच सिंहाचा वाटा : संजू परब

मडुरा पूल मंजुरीत माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांचाच सिंहाचा वाटा : संजू परब

*कोकण Express*

*मडुरा पूल मंजुरीत माजी जि.प. अध्यक्षा संजना सावंत यांचाच सिंहाचा वाटा : संजू परब*

फुकाचे श्रेय घेण्यापेक्षा केसरकरांनी मतदार संघातील रस्ते-पूल सुधारावेत*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

मडुरा पुलासंदर्भात आपण वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याकडे निवेदने सादर केली होती. मात्र माझा गाव असल्याने आमदार केसरकर यांनी या पुलासाठी निधी देण्यास वेळोवेळी आडकाठी केली होती. त्यानंतर१५ ऑक्टोबर २०२१ रोजी मडुरा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी आंदोलन केल्यानंतर जिल्हा परिषद अध्यक्षा संजना सावंत यांनी मे महिन्यापर्यंत या पूलाच्या मंजूरीचे आश्वासन दिले होते. त्याच पार्श्वभूमीवर हे पूल मंजूर झाले असून त्यात संजना सावंत यांचा सिंहाचा वाटा आहे. आ. केसरकरांनी फुकाचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये. जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री दर्जा असतो हे केसरकर विसरले असतील. त्यामुळे त्यांनी अशी लुडबुड करण्यापेक्षा तालुक्यातील अनेक रस्ते व पुले नादुरुस्त झाली आहेत त्यासाठी प्रयत्न करावेत असा उपरोधिक सल्ला भाजपचे जिल्हा प्रवक्ते संजू परब यांनी दिला.

सावंतवाडी येथील संपर्क कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, दिलीप भालेकर, बंटी पुरोहित, अमित परब आदी उपस्थित होते. आमदार दीपक केसरकर यांना ज्याप्रमाणे सेनेत किंमत राहीली नाही त्याचप्रमाणे प्रशासनातही राहिली नाही. कबुलायतदार गावकर प्रश्नी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात कोकण आयुक्तांसमवेत झालेल्या बैठकीत आमदारांनी आपल्याला आमंत्रण दिले नसल्याचे सांगत अधिकारी आपल्याला किंमत देत नाहीत याची कबुली त्यांनी पुन्हा एकदा दिली आहे. याच रागातून संबंधित अधिकाऱ्यांवर हक्कभंग आणण्याचे वक्तव्य त्यांनी केले होते. मात्र, कोकण आयुक्त तसेच जिल्हाधिकारी यांची कोणीही भेट घेत चर्चा करू शकते. त्यामुळे आमदार केसरकर यांनी आधी अभ्यास करावे नंतर बोलावे, असा सल्ला भाजपचे जिल्हा प्रवक्ते तथा माजी नगराध्यक्ष संजू परब यांनी दिला.

मुळात आमदार दीपक केसरकर यांची आता काहीच ताकद राहिली नाही. विधानसभा निवडणुकीत ते थोडक्यात निवडून आले. जिल्हा बँक व स्थानिक स्वराज्य निवडणुकांमध्येही आम्हीच वरचढ ठरलो. आता तर नगरपालिका निवडणुकीत सेनेकडे सर्व जागा वर उभे करण्यासाठी उमेदवारही सापडत नाहीत अशी परिस्थिती आली आहे. सेने कडेच नाहीत तर महाविकासआघाडी तिन्ही पक्षांकडे सर्व प्रभागात स्वबळावर लढण्यासाठी उमेदवार नाहीत. त्यामुळे त्यांना आघाडी करून लढण्याची भाषा करावी लागत आहे, असा टोलाही त्यांनी हाणला.

कॅनडाचे शिष्टमंडळ २८ मार्चला भारतात येत आहे. या शिष्टमंडळासोबत येत्या १ एप्रिलला पालकमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत व आपण स्वतः चर्चेला असणार असून ही चर्चा दिल्लीत होणार आहे. तसेच कॅनडाची आर्टिफिशिअल इंटेलिजन्स युनिव्हर्सिटी भारतात होत असून ती सिंधुदुर्ग जिल्ह्यात होईल असे आमदार केसरकर यांनी म्हटले होते. मात्र केंद्रात भाजपचे सरकार असून या शिष्टमंडळाशी चर्चा करण्यासाठी आमचे नेते सक्षम आहेत. केसरकरांनी लोकांना वेड बनवण्याचं आता तरी थांबवावं अशा शब्दात संजू परब यांनी त्यांची खिल्ली उडवली.

मोती तलावाच्या काठावर श्रीराम वाचन मंदिर समोर होत असलेल्या सेल्फी पॉइंटचा ठराव आम्ही सर्वानुमते घेतला होता. त्यामुळे तो बदलण्याचा अधिकार आमदार किंवा मुख्याधिकाऱ्यांना नाही. आता त्या ठिकाणी मापे घेतल्याची नाटकं करत त्याला आपणच मंजुरी दिल्याचे ते भासवत आहेत. बॅरिस्टर नाथ पै सभागृह भाजीमंडई याबाबतही ते लोकांची दिशाभूल करत आहेत. संत गाडगेबाबा भाजी मंडई साठी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पाच कोटी मंजूर झाले होते. त्याचा प्रस्ताव आम्ही केल्याचे सर्वश्रुत आहे. त्यामूळे १ कोटी ४० लाख कधी आले याची मी नक्कीच मुख्य अधिकाऱ्यांकडून माहिती घेईन. आगामी निवडणुकीमुळे केसरकर हतबल झाले असून खोटे बोला पण रेटून बोला त्यांची ओळख असल्याची टीकाही त्यांनी यावेळी केली.

जिल्हाध्यक्ष राजन तेली आमचे नेते – संजू परब
माजी खासदार निलेश राणे हे माझे दैवत असून मी जो काही आहे तो त्यांच्यामुळेच आहे. तसेच भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली हे आमचे पक्षाचे नेते आहेत. त्यांचा सल्ला आमच्यासाठी आदेश असतो. त्यांचे व माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत. जिल्हा बँक निवडणुकीत मी व माझ्या सहकार्‍यांनी प्रामाणिकपणे काम केले. त्यामुळे कोणत्याही प्रकारची नोटीस आपल्याला आली नाही. कबुलायतदार गावकर प्रश्नी झालेल्या आंदोलनात आम्ही एकत्रच होतो. त्यामुळे उगाच आमच्यात भांडण लावण्याचे काम कोणी करू नये असा सल्लाही संजू परब यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!