*कोकण Express*
*मधीसूदन नानिवडेकर हे आमच्या साठी गझलच मोठ विद्यापिठच होत—डाॅ. माधुरी चव्हाण*
*कासार्डे ः संजय भोसले*
सुरेश भटांच्या पहिल्या फळीतील शिष्य असुनही त्याचा मोठेपणा मधुसूदन नानिवडेकर यांनी कधीही मिरवला नाही. नानिवडेकर हे आमच्यासाठी गझलचं मोठं विद्यापीठ होतं, असे व्यक्त होतानाच त्यांच्याविषयीच्या अनेक आठवणींना उजाळा काव्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांनी दिला. मराठी राजभाषा दिनानिमित्त तळेरे येथील संवाद परिवाराच्या वतीने निमंत्रित कवींचे काव्य संमेलन आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
हे काव्य संमेलन गझलकार मधुसूदन नानिवडेकर यांचा स्मृती जागर म्हणून विशेष आयोजित करण्यात आले होते. सुप्रसिध्द गझलकार डॉ. माधुरी जोशी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या कवी संमेलनामध्ये सुप्रसिध्द मालवणी कवयित्री सौ. सुनंदा कांबळे, डॉ. प्रकाश बावधणकर, डॉ. सतिश पवार, संतोष टक्के, प्रमोद कोयंडे, विलास खानोलकर सहभागी झाले होते.
या कार्यक्रमाची सुरुवात डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांनी नानिवडेकर यांची गझल सादर करुन करण्यात आली.
मधुसूदन नानिवडेकर यांच्या अनेक कवीता, गझला सादर (चौकट)
या कवी संमेलनामध्ये नानिवडेकर यांच्या चांदणे, भलभलते सांगतेस, राधा, मागणी, घर अशा अनेक प्रसिध्द गझला आणि कविता सादर केल्यात. दरम्यान सर्वच मान्यवरांनी नानिवडेकर यांच्या विविध आठवणी जागविल्या. नानिवडेकर यांची हरकत नाही ही गझल डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांनी कार्यक्रमाच्या शेवटी सादर केली. त्यानंतर काहीवेळ प्रेक्षकही भावुक होऊन स्तब्ध राहिले.
या कवी संमेलनाचे आयोजन मराठी भाषा गौरव दिनानिमीत्त आयोजित केले होते. स्वत: ची एक कविता आणि नानिवडेकर यांची आवडलेली एक कविता किंवा गजल सादर करायची होती. त्यासोबतच नानिवडेकर यांची काही हृदय आठवण असेल तर ती व्यक्त करायची होती. यावेळी उपस्थीत सर्वच कविंनी नानिवडेकर अक्षरश: सर्वांसमोर उभे केलेत.
यावेळी सौ. सुनंदा कांबळे यांनी कावळो आजो, संतोष टक्के यांनी बाई यांच्यासह विलास खानोलकर, डॉ. प्रकाश बावधनकर, डॉ. माधुरी चव्हाण जोशी यांनी गझल, कविता सादर केली. तर डॉ. सतिश पवार यांनी मला दिसलेले नानिवडेकर या स्वलिखीत लेखाचे वाचन केले.

