*कोकण Express*
*कलमठ मध्ये रामदास विखाळे मित्र मंडळाकडून केपीएल क्रिकेट स्पर्धा*
*येणाऱ्या काळात स्वरूपा विखाळे यांना शिवसेना मानाचे पद देणार
*कणकवली ः प्रतिनिधी*
रामदास विखाळे मित्रमंडळाने केपीएल क्रिकेट स्पर्धेचे सुंदर नियोजन केले आहे. स्पर्धेच्या निमित्ताने चांगले खेळाडू येथे घडतील. आपण सर्वांनी या खेळाडूंना प्रोत्साहन दिले पाहिजे. रामदास विखाळे मित्र मंडळाच्या वतीने वेगवेगळ्या स्पर्धा व उपक्रम राबविले जातात. स्वरूपा विखाळे यादेखील विकास कामांसाठी धडपडत असतात. येत्या काळात त्यांनी दिलेली विकासकामे देखील लवकरच पूर्ण होतील. तसेच मागच्या वेळी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी अर्ज केला होता. मात्र आमची त्यावेळी संख्या बेरीज झाली नाही. येत्या काळात शिवसेनेची सत्ता जिल्हा परिषदेवर आल्यानंतर निश्चितच स्वरूपा विखाळे यांना मानाचे पद दिले जाईल अशी ग्वाही आमदार वैभव नाईक यांनी दिली. रामदास विखाळे मित्रमंडळ आयोजित केपीएल 2022 स्पर्धेच्या उद्घाटन प्रसंगी श्री नाईक बोलत होते. कलमठ येथील कलेश्वर मंदिरानजीक या सलग तीन दिवस चालणाऱ्या भव्य क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे या उद्घाटन प्रसंगी शिवसेना नेते संदेश पारकर, युवा सेना जिल्हाप्रमुख व जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक, कलमठ येथील प्रतिष्ठित सुनील नाडकर्णी, उद्योजक सतीश नाईक, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजू शेट्ये, संकेत नाईक, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा विखाळे, सामाजिक कार्यकर्ते रामदास विखाळे, माजी नगरसेवक भूषण परुळेकर, युवासेना समन्वयक राजू राठोड, युवा सेना तालुका प्रमुख ललित घाडीगांवकर, विभाग प्रमुख अनुप वारंग, राष्ट्रवादीचे सरचिटणीस रुपेश जाधव, ग्रामपंचायत सदस्य रुपेश आमडोसकर, सरपंच धनश्री मेस्त्री, ऍड हर्षद गावडे, सचिन आचरेकर, समीर आचरेकर, निसार शेख, रिमेश चव्हाण, विनय हडकर, आदी उपस्थित होते. यावेळी कलमठ येथील मानकरी व प्रतिष्ठित नागरिक सुनील नाडकर्णी म्हणाले, कणकवलीत क्रिकेट स्पर्धा व विविध स्पर्धा होण्यासाठी एक चांगलं रणजी क्रिकेट होण्यासारखं मैदान होण्याची गरज आहे. आज व्यासपीठावर असणारी मंडळी हे करू शकतात. आपल्या सिंधुदुर्गातून दिग्गज खेळाडू आज देशात चमकले. कलमठ मधील एक तरी खेळाडू रणजी किंवा आयपीएल मध्ये दिसावा अशी आमची अपेक्षा आहे. तसेच कलमठ कलेश्वर मंदिरानजीक चा केटी बंधारा येत्या काळात पूर्ण व्हावा अशी मागणी देखील श्री नाडकर्णी यांनी केली. शिवसेना नेते संदेश पारकर म्हणाले, रामदास विखाळे कायमच नेहमी जनतेच्या अडचणीला धावून जातात. त्यांच्या सारखा चांगला कार्यकर्ता शिवसेनेला मिळाला. शिवसेनेला आता ग्रामीण भागात उज्वल भवितव्य आहे. रामदास विखाळे यांचे कणकवली तालुक्यात शिवसेनेसाठी काम सुरू आहे. रामदास विखाळे यांचा जनसंपर्कही दांडगा आहे. भारतीय संघाने जागतिक स्तरावर अनेक विक्रम केले. सांघिक भावनेने मैदानात काम करा. खिलाडूवृत्ती स्विकारुन स्पर्धा यशस्वी करा. तरुणांमध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून आत्मविश्वास निर्माण केला जातो. पुढील तीन दिवस ही स्पर्धा येथे चालणार आहे त्यासाठी श्री पारकर यांनी शुभेच्छा दिल्या.
या स्पर्धेच्या उद्घाटना नंतर लिंगेश्वर स्पोर्ट विरुद्ध अधिकारी स्पोर्ट यांच्यात सामना रंगला यावेळी उपस्थित मान्यवरांचा सत्कार देखील मित्र मंडळाच्या वतीने करण्यात आला.