*कोकण Express*
*फोंडाघाट-गांगोवाडी रस्त्याचे री-टेंडर काढून काम पूर्ण करा…*
*जिल्हा परिषदची सभा; सभापती महेंद्र चव्हाण यांचे बांधकामला आदेश…*
*सिंधुदुर्गनगरी,ता.०३:*
फोंडाघाट गांगोवाडी रस्ता कामाचा कार्यारंभ आदेश देऊन वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. तरी संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याचे काम होणार नसेल तर कामाचे री-टेंडर काढून रस्त्याचे काम पूर्ण करा. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाला दिले.
जिल्हा परिषद बांधकाम समितीची सभा सभापती महेंद्र चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली आज येथील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात संपन्न झाली. यावेळी समिती सचिव तथा प्रभारी बांधकाम कार्यकारी अभियंता दत्तराम सावंत ,समिती सदस्य संजय आंग्रे, संजय देसाई .श्रीया सावंत आदींसह खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
कणकवली तालुक्यातील फोंडा गांगोवाडी रस्त्याचे काम मंजूर असून या कामाचा कार्यारंभ आदेश देऊन वर्ष उलटले तरी अद्याप रस्त्याचे काम का सुरू झाले नाही, हे काम पूर्ण करण्याच्या दृष्टीने बांधकाम विभागाने काय कार्यवाही केली. अशी विचारणा सदस्य संजय आंग्रे यांनी केली असता संबंधित ठेकेदाराला रस्त्याचे काम तात्काळ सुरू करण्याची नोटीस बजावण्यात आली असल्याचे सांगण्यात आले. यावर संबंधित ठेकेदाराकडून कामाला अद्याप सुरुवात केलेली नाही, त्यामुळे त्याच्याकडून काम पूर्ण होणार नसेल तर त्या रस्त्याच्या कामाचे री-टेंडर काढून काम पूर्ण करा. असे आदेश सभापती महेंद्र चव्हाण यांनी बांधकाम विभागाला दिले.
कणकवली तालुक्यातील फोंडा शाळा नंबर-१ च्या आवारातील एकूण २८ गुंठे जागेपैकी १४ गुंठे जागा मूळ जमीन मालकाला परत करावी. अशी मागील सभेत सूचना करण्यात आली होती. या सूचनेनुसार काय कार्यवाही केली. असा प्रश्न सदस्य संजय आंग्रे यांनी सभेत उपस्थित केला असता संबंधित शाळेची जागा मूळ जमीन मालकांने मोजणी करून घ्यावी. असे संबंधित शाळा व्यवस्थापन समितीचे म्हणणे आहे. त्यानुसार लवकरच जमीन मोजणीची प्रक्रिया पूर्ण करून जमिनीची विभागणी केली जाईल. असे सभेत सांगण्यात आले.