*कोकण Express*
*सावित्रीबाई फुले दिन केवळ स्त्रियांचाच नव्हे तर प्रत्येकाच्याच आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारा दिवस ; सौ.अर्पिता मुंबरकर*
३ जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस. हा दिवस केवळ स्त्रियांचाच नव्हे तर प्रत्येकांच्याच आयुष्यात परिवर्तन घडवून आणणारा आहे.
सेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रीयांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड वाट सावित्रीबाई चालत राहिल्या म्हणूनच आज आपली प्रशस्त वाट तयार झाली..,.. या वाटेवरून चालताना सावित्रीबाई फुले यांची आठवण जागवायला हवीच!
रूढी ,परंपरा, कर्मकांड, जातीव्यवस्था, बालविवाह, केशवपन, सती प्रथा याविरोधात सावित्रीबाईंनी ज्योतीबांच्या साथीने शेवटच्या क्षणापर्यंत लढत राहिल्या.
मानवी जीवन विज्ञान निष्ठेवर आधारित असावे यासाठी महत्त्वाचे आहे शिक्षण असे म्हणत स्वतःला शिक्षण घेऊन शिक्षिका बनल्या”जो धर्मग्रंथ आम्हाला वाचण्याची व ऐकण्याची मनाई आहे त्यातील नियम आम्ही का पाळावा”असे म्हणणारी मुक्ता साळवे सारखी विद्यार्थी त्यांनी घडविले.
शिवाय त्या काळात बालविधवांच्या प्रमाण जास्त असे त्या विधवांच्या असहाय्यतेचा फायदा बलाढ्य ब्राम्हण लोक घेऊन तिला वाऱ्यावर सोडून देत अशावेळी त्या विधवेवर पोटातील बाळा सकट आपला जीव गमावण्याची वेळ येई.असे प्रसंग थांबविण्यासाठी फसलेल्या मुलींना सूतिका ग्रहाचा फायदा घेऊन आपल्या बाळाला जन्म देऊन जाता येईल या प्रकारची जाहिरात करून भारतातील नव्हे तर जगातील पहिले बालहत्या प्रतिबंध सुतीका ग्रहाची स्थापना सावित्रीबाईंनी ज्योतिबाच्या मदतीने केली. इतक्या वर्षानंतर आजही अशा गोष्टीचा वाजगाजा न करता केवळ कुजबुज केली जाते! पण त्यावेळी सावित्रीबाई ने केलेले केवढे धाडस!
आज समाजामध्ये बचत गटांसाठी चळवळ जोमाने उभारते आहे. त्या काळातही सावित्रीबाईंनी आपल्या सारख्या सामाजिक वैचारिक विचारांची देवाण-घेवाण करणाऱ्या समविचारी महिलांना एकत्र करून महिला मंडळाची स्थापना केली या मंडळाच्या माध्यमातून अनेक सामाजिक स्तुत्य उपक्रम सुरू केले जसे की महिलांसाठी त्यांच्या नटाण्या मुरुडच्या साठी, उंबऱ्याच्या बाहेर पडण्यासाठी मकर संक्रात हा सण महिलांसाठी प्रवणि ठरतो त्याचाच उपयोग करत त्या काळी त्यांनी सर्व जाती धर्मातील महिला विधवा परित्यक्त्या अशा सर्व महिलांना एकत्र एकाच मांडवात एकाच छताखाली हळदीकुंकू सारखे कार्यक्रम घडवून आणले. परिवर्तन घडवून आणण्यासाठी अशा परंपरावादी उत्सवाचा उपयोग सावित्रीबाईनी अतिशय तल्लखपणे केला.
त्याच काळात विधवांना विद्रूप करण्यासाठी विधवांचे केशवपन करण्यात येईल, केशवपन थांबविणे कर्मठ पुरुषसत्ताक व्यवस्थेला मान्य नाही हे लक्षात घेऊन न्हाव्यांचा संप घडवून अमुलाग्र क्रांतीची चळवळ सावित्रीबाईंनी उभी केली. आजही अशा निरनिराळ्या चळवळींची गरज समाजात आहे. खरे तर इतक्या प्रदीर्घ काळानंतरही स्त्रियांमध्ये फारसे परिवर्तन होताना दिसत नाही. स्त्रिया कर्मकांडातून बाहेर यायला हवेत, प्रथम व्रतवैकल्येच्या जंजाळातून स्वतःला सोडवायला हवे!
आज समाजात समता स्थापन करण्यासाठी स्त्रियांनीच लढा दिला पाहिजे असे नाही तर या कार्यात समविचारी स्त्री-पुरुषांना बरोबर घेऊन लढले पाहिजे जो लढा सावित्री ज्योतीबांनी दिला त्याच प्रमाणे!
स्त्रीशिक्षणाबरोबरच समाजाची धार्मिक-अध्यात्मिक आणि सांस्कृतिक गरज फुले दाम्पत्याने ओळखली होती म्हणून सत्यशोधक विवाह पद्धती विकसित केली., हळदी कुंकवा सारखे पारंपारिक उपक्रम समता प्रस्थापित करण्यासाठी राबविले, उपासनेसाठी अखंड लिहिले. मग आपण स्वतःला पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी महामानवाने वारसदार समजत असू तर त्यांचा वसा पुढे चालवला पाहिजे.

