भाजपातील गद्दारांची गय केली जाणार नाही- राजन तेली

भाजपातील गद्दारांची गय केली जाणार नाही- राजन तेली

*कोकण Express*

*भाजपातील गद्दारांची गय केली जाणार नाही- राजन तेली…*

*भाजपा नेत्यांच्या आदेशानुसार पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाचे काम करणार*

*बँकेतील पराभवानंतर व्यक्त केली भूमिका..*

*कणकवली : प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत ज्यांनी गद्दारी केली, चुकीचे काम केलं आहे. त्यांना यापुढे पक्षाची पदे,उमेदवारी मिळणार नाही.माझ्या विरोधात काम केलेल्या सगळ्या गोष्टींचा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्याकडे दिला जाईल. आतापर्यंत मी सगळ्यांशीच सौजन्याने वागलो. भाजपातील गद्दारांची गय केली जाणार नाही,वेळप्रसंगी अध्यक्षपदाचे अधिकार वापरणार असल्याचा इशारा भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिला.तसेच पुढील काळात भाजपा नेत्याच्या आदेशानुसार पुन्हा जिल्हाध्यक्ष पदाचे काम करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

येथील भाजप कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत राजन तेली बोलत होते.यावेळी बबलू सावंत,धोंडी चिंदरकर आदी उपस्थित होते.

जिल्हा बँकेत माझ्या झालेल्या पराभवाबाबत मी नंतर बोलणार आहे. सध्या मात्र जिल्हा बँक भाजपच्या ताब्यात आली त्याचा मला मोठा आनंद आहे. मी राजीनामा दिल्याचे जाहीर केल्यानंतर पक्षातील माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यासह सर्वच पदाधिकारी, नेते, कार्यकर्त्यांचे फोन आले. या सर्वांनी राजीनामा मागे घेण्याची विनंती केली. तसेच मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचेही स्पष्ट केले होते. मात्र सर्वांच्या आग्रही विनंतीनंतर पुन्हा जिल्हाध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहे. मात्र आता सर्वांशी सौजन्याने वागण्याबाबत विचार केला जाणार आहे. निवडणुकांत जे गद्दारी करतील, पक्षाच्या विरोधात काम करतील, त्यांना यापुढे पदे मिळणार नाहीत. त्या सर्वांचा अहवाल प्रदेशाध्यक्षांकडे पाठवला जाणार असल्याचाही इशारा श्री. तेली यांनी पक्षांतर्गत विरोधकांना दिला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!