*कोकण Express*
*▪️तळेरे – वैभववाडी – कोल्हापूर महामार्गावरील व कासार्डे आनंदनगर येथील ब्रिजलगतचे धोकादायक खड्डे तात्काळ बुजविले!*
*▪️सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांच्या ससेमिर्याला अभुतपूर्व यश*
*कासार्डे ः संजय भोसले*
तळेरे – वैभववाडी – कोल्हापूर महामार्गावरील कासार्डे आनंदनगर येथील ब्रिजलगतचे धोकादायक खड्डे अखेर संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने तात्काळ डांबर खडी भरून बुजविले आहेत. यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांना आपल्या अनोख्या शैलीत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा केल्यानेच या खड्डयांची रखडलेली समस्या तात्काळ मार्गी लागली आहे.
तळेरे – वैभववाडी – कोल्हापूर महामार्गावर मोठ्या प्रमाणावरती प्रवासी व अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावरती होत असते. त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या महामार्गावर खड्डे पडण्यास सुरुवात होते. असेच खड्डे या महामार्गावर कासार्डे – आनंदनगर येथील ब्रिजलगत पडले होते. या खड्डयांमुळे सदर ठिकाणी दुचाकीचे अनेक छोटे – मोठे अपघात घडून त्यात अनेक व्यक्ती जखमी देखील झाल्या आहेत. तसेच या खड्डयांना चुकविण्यासाठी अनेक वाहनचालक आपली वाहने विरुद्ध दिशेने हाकत असत.त्यामुळे हे मोठे भगदाड पडून पडलेले खड्डे मृत्यूचा सापळा बनले होते.हे खड्डे चुकविण्याच्या नादात दोन्ही बाजूंची वाहने आमने सामने येण्याचा प्रसंग बऱ्याचदा पहायला मिळत होते.त्यामुळे समोरून येणाऱ्या वाहनांचा केव्हाही अपघात होण्याची दाट संभावना होती. तसेच पादचारी वर्गास देखील या खड्यांमुळे महामार्गाच्या बाजूने चालताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागत होती. त्यामुळे या खड्डयांची समस्या दिवसेंदिवस अत्यंत गंभीर बनत चालली होती.
याबाबत राजेश जाधव यांनी संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणास अनेकदा गांभीर्यपूर्वक कल्पना दिली. परंतु प्रशासकीय प्रचलित पद्धतीप्रमाणे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने कार्यवाही करण्यास विलंब व दुर्लक्ष केला. सदर खड्डयांच्या समस्येचे निराकरण करण्यासाठी स्थानिक लोकप्रतिनिधी देखील पुढाकार घेत नव्हते. ही बाब लक्षात येताच राजेश जाधव यांनी आपल्या अनोख्या शैलीत संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठपुरावा सुरू केला. या पाठपुराव्यानंतर केवळ दोनच दिवसात संबंधित राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने सदरचे खड्डे डांबर मिश्रीत खडीने भरून तात्काळ बुजविले. याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते राजेश जाधव यांचेसह त्यांचे सहकारी निलेश तळेकर उपस्थित होते.अपघातास कारणीभूत ठरणारे मोठे खड्डे बुजविण्यात आल्याने वाहन चालकांनी समाधान व्यक्त केले.

