गणेशोत्सव कालावधीकरिता कणकवली नगरपंचायतीने भाजी, फळे, फूले व अन्य विक्रीबाबत केले नियोजन

गणेशोत्सव कालावधीकरिता कणकवली नगरपंचायतीने भाजी, फळे, फूले व अन्य विक्रीबाबत केले नियोजन

*कोकण  Express*

*कणकवली नगरपंचायतकडून गणेशोत्सवाचे नियोजन*

*गणेशोत्सव कालावधीकरिता कणकवली नगरपंचायतीने भाजी, फळे, फूले व अन्य विक्रीबाबत केले नियोजन* ​​

*गणेशोत्सव काळात डीपी रोडवर भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यास त्यांच्यावर कारवाई*

*कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे,उपनगराध्यक्ष बंडू हर्णे*

​​ *कणकवली ः प्रतिनिधी*

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कणकवली शहरात भाजी, फळ, फूल ,कपडे व स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रेत्यांसाठी नियोजन करण्यात आले असून कणकवली शहरात वाहतूक कोंडी उद्भवू नये व जनतेला योग्य प्रकारे शहरात सुविधा मिळावी या दृष्टीने कणकवली नगरपंचायतकडून गणेशोत्सवाचे नियोजन झाले आहे. गणेशोत्सव काळात डीपी रोडवर भाजी विक्रेत्यांनी दुकाने थाटल्यास त्यांच्यावर कारवाई होणार. तसेच कणकवली पटवर्धन चौक ते ढालकाठी पर्यंतच्या रस्त्यावर नो हॉकर्स झोन राहणार आहेत. त्याचबरोबर फ्लाय ओव्हर ब्रिज खालील मोकळ्या जागेत भाजी, फळ, फूल कपडे व स्टेशनरी, कटलरी साहित्य विक्रेत्यांना नंबरिंग करून जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यानुसारच या विक्रेत्यांनी आपली दुकाने लावायची आहेत अशा सूचना कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे व उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी आजच्या विक्रेत्यांसोबतच्या बैठकीत दिल्या. कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या दालनात गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मंगळवारी भाजी, फळ, फुल व हातगाडी वरील विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, आरोग्य सभापती अभिजीत मुसळे, गटनेते संजय कामतेकर, नगरसेवक ​कन्हैया पारकर, महेश सावंत, अनिल हळदिवे, सतीश कांबळे, पांडू वर्दम, राजा पाटकर, भाजी, फळ, फुल, हातगाडी विक्रेते आदी उपस्थित होते. स्टेट बँक ते सह्याद्री हॉटेल पर्यंतच्या फ्लाय ओव्हर ब्रिज खाली मोकळ्या जागेत फळ भाजी फुले विक्रेते रिक्षा, सहा सीटर यांना गणेशोत्सव कालावधीत थांबविण्याकरिता जागा करून देण्याचे निश्‍चित करण्यात आले. यात स्टेट बँके समोरील भागात टेम्पो, अभ्युदय बँकेचे समोरील भागात रिक्षा तर पटवर्धन चौकात लागून असलेल्या भागात गणेशोत्सव कालावधीत लागणारे गावठी साहित्य विक्री करता आणणाऱ्या विक्रेत्यांना बसण्यासाठी जागा निश्चित करून देण्यात येणार आहे. तर लक्ष्मी दत्त कॉम्प्लेक्सच्या समोरील भागात जे ब्रिजचे ​२ गाळे आहेत येथे फळ, फुले व भाजीविक्रेते यांना जागा उपलब्ध करून देण्यात येणार आहे. याच ठिकाणी एका बाजूला लहान किरकोळ भाजी विक्रेते आहेत ​त्यांना जागा राखीव ठेवण्यात येणार आहे. त्यापुढे कटलरी साहित्य व कपडे व्यवसायिकांना जागा देण्यात येणार आहे. तर पेट्रोल पंपाच्या समोरील भागात सहा सीटर रिक्षा चालकांना जागा देण्यात येणार आहे. बाजूला सहा सीटर व उर्वरित भागात दुचाकी पार्किंगसाठी जागा तयार करण्यात येणार आहे. असे नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांनी सांगितले. यावेळी कन्हैया पारकर यांनी जागा नेमून देत असताना प्रत्येक विक्रेत्याची लिस्ट व मोबाईल नंबर घ्या व प्रत्येक जागेला नंबरिंग करा अशी सूचना केली. नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष यांनी ही सूचना मान्य करत त्यानुसार येत्या दोन दिवसात हे नंबरिंग पूर्ण करण्यात येईल व जागा आखून देण्यात येईल असे सांगितले. फ्लायओव्हरच्या ब्रिजच्या खाली या विक्रेत्यांना दिलेल्या जागी जाण्यासाठी इन आऊट असे मार्ग ठेवण्यात येतील. व बॅरिकेटला लागूनच ग्रीन नेट लावण्यात येईल. एकाच जागेवर भाजी, फळ किंवा फुले मिळणार असल्याने ग्राहक इतरत्र फिरणार नाहीत. पण कोणत्याही परिस्थितीत सर्विस रस्त्यालगत दुकाने मांडता येणार नाहीत. तसेच पटवर्धन चौक ते ढालकाठी पर्यंत रस्त्यावर, गटारावर भाजी किंवा अन्य वस्तूंची दुकाने लावता येणार नाहीत. तसेच पटवर्धन चौक ते ढालकाठी पर्यंत हातगाडी विक्रेत्यांनाही हातगाड्या घेऊन जाण्यास परवानगी असणार नाही. यावेळी अशा हातगाड्या आढळल्यास त्यांच्यावर कारवाई होणार आहे. यावेळी काही विक्रेत्यांनी दुकान गाळ्यांमध्ये भाजी किंवा फळांची दुकाने लावण्या​स​ परवानगी देण्याची मागणी केली. मात्र दुकान गाळ्यामध्ये बाजारपेठेत दुकाने लावण्यास नगरपंचायतचा विरोध नाही. पण ती दुकाने जर गटार किंवा रस्त्यापर्यंत आली तर मात्र कारवाई होईल. असा इशारा यावेळी देण्यात आला. त्याच धर्तीवर डीपी रोडवर देखील दुकाने असलेल्या गाळ्यांमध्ये भाजी, फळ किंवा फुले किंवा असलेली दुकाने सुरू राहतील. पण डीपी रोडवर जर दुकान थाटले गेल्यास त्याच्यावर मुख्याधिकाऱ्यांकडून कारवाई केली जाणार असल्याचा इशाराही नलावडे यांनी दिला. ज्या विक्रेत्यांना नगरपंचायत जागा आखून देणार व नबरींग करून देणार त्याठिकाणी त्या विक्रेत्याने आपले दुकान लावायचे आहे. याकरिता त्या विक्रेत्यांना नगरपंचायतीच्या कराचे नाममात्र शुल्क भरावे लागणार आहे. पण नगरपंचायतने ठरवून दिलेले ​२०-४० रुपयांच्या व्यतिरिक्त जागेनुसार आकारणी केलेले शुल्क वगळून इतर कुणालाही जादाचे पैसे मागणी केले तरी देऊ नका असेही आवाहन नलावडे यांनी केले. तसेच फ्लायओव्हर ब्रिजच्या खालील भागात रात्रीच्या वेळी विक्रेत्यांसाठी लाईटची व्यवस्था देखील करण्यात येईल असे नगरपंचायत कडून स्पष्ट करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!