*कोंकण एक्सप्रेस*
*गायरान जमिनीवरील प्रस्तावित खाण प्रकल्पास मोजे बोडदे ग्रामस्थांचा एकमुखी विरोध*
*दोडामार्ग : गवस शुभम*
मोजे बोडदे (ता. दोडामार्ग) येथील गावाच्या गायरान जमिनीवर प्रस्तावित खाण प्रकल्पास विरोध करण्यासाठी २९ जुलै २०२६ रोजी श्री सातेरी देवी मंदिर, बोडदे येथे ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले. या सभेला गावातील सर्व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित राहून प्रस्तावित खाण प्रकल्पाला एकमुखाने कडाडून विरोध दर्शविला.
सभेदरम्यान गावचे पोलीस पाटील, सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच सामाजिक कार्यकर्ते रान माणूस प्रसाद गावडे यांनी आपापली भूमिका स्पष्ट करत गावाच्या पर्यावरणाचे, गायरान जमिनीचे आणि नैसर्गिक संपत्तीचे संरक्षण करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याचे आवाहन केले.
गावाच्या वतीने श्री फटी नार्वेकर तसेच इतर ग्रामस्थांनी प्रस्तावित खाण प्रकल्पामुळे पर्यावरण, जलस्रोत, शेती आणि गावाच्या विकासावर होणाऱ्या संभाव्य परिणामांविषयी चिंता व्यक्त केली. ग्रामस्थांनी गावाच्या हिताविरुद्ध असलेल्या या प्रकल्पास कोणत्याही परिस्थितीत परवानगी दिली जाणार नाही, अशी ठाम भूमिका मांडली.
विशेष म्हणजे, गोवा, मुंबई, पुणे, बेळगाव तसेच भारतीय सैन्यात (Indian Army) कार्यरत असलेले मोजे बोडदे गावचे नागरिकही गावाच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले आहेत. गावाच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे योगदान देण्याचा आणि गायरान जमिनीचे संरक्षण करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.
या सभेत जाती-पाती, पक्षीय भेद किंवा वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून सर्व समाजघटक, विविध राजकीय पक्षांचे कार्यकर्ते, ज्येष्ठ नागरिक, युवक, महिला मंडळ तसेच ग्रामस्थांनी एकमुखाने खाण प्रकल्पास विरोध करण्याचा ठराव मंजूर केला. भविष्यातही गावाच्या हिताला बाधा पोहोचवणारा कोणताही प्रकल्प गावात येऊ दिला जाणार नाही, असा निर्धार सर्व उपस्थितांनी व्यक्त केला.
या बैठकीतून मोजे बोडदे ग्रामस्थांची एकजूट आणि गावाच्या पर्यावरण, गायरान जमीन व भावी पिढ्यांच्या हिताचे संरक्षण करण्याची सामूहिक भूमिका अधोरेखित झाली.

