प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत पूर्ण करा

प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत पूर्ण करा

*कोंकण एक्सप्रेस*

*प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत पूर्ण करा*

*कामात हयगय खपवून घेतली जाणार नाही– जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*

*कुडाळ – मालवण मतदारसंघाचा घेतला आढावा*

*दिव्यांगत्वावर इच्छाशक्तीची मात; दिव्यांग असूनही स्वेच्छेने मोहिमेत सक्रिय सहभाग*

*सिंधुदुर्ग*

भारत निवडणूक आयोगाच्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision-SIR) २०२६ मोहिमेअंतर्गत प्रगणना (Enumeration) फॉर्मचे डिजिटायझेशन विहित मुदतीत शंभर टक्के पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिले. या महत्त्वाच्या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा हयगय करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक प्रशासकीय कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला.

कुडाळ तहसील कार्यालयात कुडाळ – मालवण मतदार संघातील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी तसेच सर्व मतदान केंद्रस्तरीय पर्यवेक्षक (सुपरवायझर) यांच्या आढावा बैठकीत त्या बोलत होत्या. यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी बालाजी शेवाळे, प्रांत अधिकारी ऐश्वर्या काळुशे, तहसीलदार सचिन पाटील, मालवण निवडणूक विभागातील नायब तहसीलदार प्रिया हरणे यांच्यासह संबंधित अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.

बैठकीत प्रगणना फॉर्म संकलन, डिजिटायझेशन, पडताळणी तसेच प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. सध्या पाऊस कमी असल्याने सर्वांनी कामात गती आणून काम पूर्ण करावे. ज्या ठिकाणी कामाची गती अपेक्षेप्रमाणे नाही, त्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

यावेळी श्रीमती धोडमिसे म्हणाल्या की, मतदार यादीची अचूकता आणि पारदर्शकता सुनिश्चित करण्यासाठी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेला अत्यंत महत्त्व आहे. त्यामुळे प्रत्येक प्रगणना फॉर्मचे डिजिटायझेशन वेळेत आणि त्रुटीरहित पद्धतीने पूर्ण होणे आवश्यक आहे. ज्या मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांकडे (बी.एल.ओ.) कामाची प्रगती कमी आहे, त्यांना आवश्यकतेनुसार अतिरिक्त मदतनीस उपलब्ध करून देऊन कामाला गती द्यावी. सर्व अधिकाऱ्यांनी नियमित आढावा घेऊन दैनंदिन प्रगती सुनिश्चित करावी, असे निर्देश त्यांनी दिले.

मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांनी मतदान केंद्रस्तरीय अभिकर्ते (बी.एल.ए.) यांचे सहकार्य घेऊन प्रत्येक मतदाराची माहिती अचूकपणे अद्ययावत करण्यासाठी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले.

विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेतील सर्व टप्पे विहित वेळेत पूर्ण करून प्रगणना फॉर्मचे १०० टक्के डिजिटायझेशन साध्य करण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जबाबदारीने आणि काटेकोरपणे काम करावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी यावेळी केले.

दिव्यांगत्वावर इच्छाशक्तीची मात; राष्ट्रीय कर्तव्यासाठी प्रेरणादायी योगदान

विशेष सखोल पुनरीक्षण (SIR-2026) या राष्ट्रीय महत्त्वाच्या मोहिमेत मालवण तालुक्यातील वायंगणी ग्रामपंचायतीचे लिपिक जयेश परब यांनी आपल्या जिद्द, कर्तव्यनिष्ठा आणि सामाजिक बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श घालून दिला आहे.

स्वतः दिव्यांग असूनही केवळ प्रशासकीय जबाबदारीपुरते मर्यादित न राहता, “या राष्ट्रीय कार्यात माझाही सक्रिय सहभाग असावा,” या भावनेतून त्यांनी स्वखुशीने मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. सध्या ते मालवण तालुक्यातील वायंगणी येथील मतदान केंद्र क्रमांक २७ वर विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेचे काम अत्यंत समर्पितपणे पार पाडत आहेत.

याच मोहिमेत मंगेश परब हे देखील सुपरवायझर म्हणून आपली जबाबदारी निष्ठेने बजावत आहेत. विशेष म्हणजे, तेही दिव्यांग असूनही अत्यंत उत्साहाने आणि कर्तव्यभावनेने या राष्ट्रीय उपक्रमात योगदान देत आहेत.

शारीरिक मर्यादा ही यशाची किंवा कर्तव्यपूर्तीची अडचण नसून, दृढ इच्छाशक्ती, समर्पण आणि राष्ट्रसेवेची भावना असेल तर कोणतेही कार्य यशस्वीपणे पार पाडता येते, हे जयेश परब आणि मंगेश परब यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे. त्यांचे योगदान केवळ विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेलाच बळ देणारे नाही, तर समाजातील प्रत्येक नागरिकाला प्रेरणा देणारे आणि दिव्यांग व्यक्तींच्या सामर्थ्याची जाणीव करून देणारे आहे.

राष्ट्रीय कर्तव्याला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी उभा केलेला हा आदर्श निश्चितच समाजासाठी प्रेरणादायी ठरणारा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!