*कोंकण एक्सप्रेस*
*खाण प्रकल्पाविरोधात उसपवासीय एकवटले; प्रकल्पविरोधी एकमुखी ठराव*
*दोडामार्ग : शुभम गवस*
दोडामार्ग तालुक्यातील उसप गावात प्रस्तावित खाण प्रकल्पाला ग्रामस्थांनी तीव्र विरोध दर्शवत एकजूट कायम ठेवली आहे. गावाच्या हितासाठी आणि पर्यावरणाच्या संरक्षणासाठी ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात एकमुखी ठराव करत आपली ठाम भूमिका जाहीर केली.
या आंदोलनाला आता विविध स्तरांतून पाठिंबा मिळू लागला असून, सिंधुदुर्ग फळबागायतदार संघानेही उसप ग्रामस्थांच्या लढ्याला जाहीर पाठिंबा दिला आहे. संघाचे अध्यक्ष विलास सावंत यांनी उसप गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधला आणि त्यांच्या आंदोलनाला नैतिक पाठिंबा व्यक्त केला.
यावेळी सावंत यांनी गावातील शेती, बागायती, जलस्रोत आणि पर्यावरणावर खाण प्रकल्पाचा होणारा संभाव्य परिणाम लक्षात घेता ग्रामस्थांचा लढा योग्य असल्याचे मत व्यक्त केले. शेती व बागायतीवर अवलंबून असलेल्या परिसरात असे प्रकल्प राबविताना स्थानिकांच्या भावना आणि पर्यावरणाचा विचार होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
ग्रामस्थांनीही कोणत्याही परिस्थितीत खाण प्रकल्पाला विरोध कायम ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न असल्याने सर्व ग्रामस्थ एकजुटीने लढा सुरू ठेवणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
उसप ग्रामस्थांच्या आंदोलनाला मिळत असलेल्या वाढत्या पाठिंब्यामुळे खाण प्रकल्पाचा मुद्दा अधिक तीव्र होत असून, पुढील काळात आंदोलनाची दिशा काय राहणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

