माऊलींच्या कृपेने झगमगली दाणोली नगरी; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा यशस्वी पाठपुरावा

माऊलींच्या कृपेने झगमगली दाणोली नगरी; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांचा यशस्वी पाठपुरावा

*कोंकण एक्सप्रेस*

*माऊलींच्या कृपेने झगमगली दाणोली नगरी; वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संदीप सुकि यशस्वी पाठपुरावा*

*दाणोली:प्रतिनिधि*

आंबोली घाटाच्या पायथ्याशी वसलेल्या आणि सद्गुरू साटम महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निसर्गरम्य दाणोली गावातील विस्कळीत झालेला वीज पुरवठा अखेर सुरळीत करण्यात आला आहे. माऊली मित्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे आणि महावितरणच्या युद्धपातळीवरील कामामुळे दाणोली नगरी पुन्हा एकदा प्रकाशमान झाली आहे.
​दाणोली येथील स्थानिक समाजसेवक संदीप सूर्यकांत सुकी यांनी गावातील वीज समस्येबाबत सविस्तर माहिती दिली. ते म्हणाले की, “आमच्या गावावर सद्गुरू साटम महाराजांची मोठी कृपा आहे, ज्यामुळे वर्षभर पाऊस पडला नाही तरी पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत नाही. मात्र, गावातील पर्यटन व्यवसायाला चालना देण्यासाठी आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना हक्काचा रोजगार मिळवून देण्यासाठी येथील वीज पुरवठा कायमस्वरूपी सुरळीत राहणे अत्यंत गरजेचे होते.”
​गावातील ही गंभीर परिस्थिती विविध माध्यमांतून सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र मनोहर पेडणेकर यांच्यापर्यंत पोहोचली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पेडणेकर यांनी तातडीने ‘माऊली मित्र मंडळा’च्या माध्यमातून महावितरणच्या संबंधित सर्व वरिष्ठ अधिकारी वर्गाशी फोनवरून संपर्क साधला, तसेच कार्यालयांमध्ये मेसेज पाठवून परिस्थितीची जाणीव करून दिली.
​त्यांच्या या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, प्रशासनाने युद्धपातळीवर दिवस-रात्र काम करून अखेर रात्री वीज पुरवठा पूर्ववत केला. या यशस्वी कामगिरीबद्दल संदीप सुकी आणि समस्त ग्रामस्थांनी राजेंद्र पेडणेकर व माऊली मित्र मंडळाचे मनापासून आभार मानले आहेत.


​कर्मचाऱ्यांचे ग्रामस्थांकडून कौतुक
रात्रं-दिवस मेहनत करून वीज पोल उभे करणाऱ्या आणि लाईन दुरुस्त करणाऱ्या वायरमन व महावितरण कर्मचाऱ्यांसाठी समाजसेवक संदीप सुकी, देवसू ग्रामपंचायत सदस्य पंकज परब, समीर शिंदे आणि प्रकाश सावंत यांनी चहा-बिस्किटांची सोय करत कृतज्ञता व्यक्त केली.
​या मोहिमेदरम्यान समाजसेवक संदीप सुकी, पंकज परब, प्रकाश सावंत, राजन जाधव, उमेश सावंत, समीर शिंदे यांच्यासह समस्त ग्रामस्थ आणि महावितरणचे कर्मचारी उपस्थित होते. “या कामासाठी ज्यांनी ज्यांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे मदत केली, त्या सर्वांचे आम्ही ऋणी आहोत,” अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!