नवतंत्रज्ञानाच्या वापरातून शेती अधिक सक्षम करा- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

नवतंत्रज्ञानाच्या वापरातून शेती अधिक सक्षम करा- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे

*कोंकण एक्सप्रेस*

*नवतंत्रज्ञानाच्या वापरातून शेती अधिक सक्षम करा- जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे*
*सिंधुदुर्गनगरी*
माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्राच्या कृषी विकासासाठी ऐतिहासिक योगदान दिलेले आहे. शेतीला आधुनिकतेची जोड देणे, सिंचन सुविधांचा विस्तार, हरितक्रांतीला चालना, कृषी संशोधनाला प्रोत्साहन आणि शेतकरी हिताच्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी या माध्यमातून त्यांनी राज्यातील कृषी क्षेत्राला नवी दिशा दिली असल्याचे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी सांगितले. आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरातून उत्पादनवाढ, खर्चात बचत आणि शेती अधिक लाभदायक बनविणे शक्य असल्याने शेतकऱ्यांनी शेती करताना नवतंत्रज्ञानाचा वापर करावा, असे आवाहनही श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना केले.
कृषी विभाग व जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषि दिन कार्यक्रमाच्या अनुषंगाने भद्रकाली मंदिर शेजारील सभागृह, आंबडपाल येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या.
यावेळी मनरेगा अंतर्गत बांबु फळबाग लागवड केलेल्या शेतकऱ्यांना, काजु कलम वाटप योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांना प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. जिल्हाधिकारी श्रीमती धोडमिसे यांनी यावेळी स्वत: शेतात उतरुन भात लागवड केली. तसेच त्यांच्या हस्ते यावेळी वृक्षारोपण देखील करण्यात आले.
यावेळी जिल्हा परीषद उपाध्यक्ष तुकाराम साईल, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी शितल कबनुरे-पुंड, वित्त व बांधकाम समिती सभापती संतोष साटविलकर, महिला व बाल विकास सभापती अनुराधा नारकर, समाज कल्याण समिती सभापती रुहिता तांबे, कुडाळ पंचायत समितीचे सभापती मिलिंद नाईक व आंबडपालचे सरपंच महेश मेस्त्री उपस्थित होते.
जिल्हाधिकारी धोडमिसे म्हणाल्या की, कै. वसंतराव नाईक यांचा दूरदृष्टीपूर्ण कृषी विकासाचा विचार आजही तितकाच प्रेरणादायी आहे. बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब, नैसर्गिक संसाधनांचे संवर्धन यावर भर देणे ही काळाची गरज आहे. शेतकऱ्यांनी शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ घेत नवतंत्रज्ञानाचा स्वीकार करून उत्पादनक्षम आणि शाश्वत शेतीकडे वाटचाल करावी. शेतकऱ्यांनी फार्मर आयडी काढण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
जिल्हा परीषद उपाध्यक्ष तुकाराम साईल यावेळी म्हणाले की, माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या दूरदृष्टीपुर्ण निर्णयामुळे राज्यात हरितक्रांती घडून आली. या हरितक्रांतीमुळे आपला देश आणि राज्य अन्नधान्याच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनले. आज शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण आणि आधुनिकीकरण झालेले आहे. आपल्या जिल्ह्यातील उद्योग शेती क्षेत्रावर आधारीत आहे. जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी शासकीय योजनांचा लाभ घ्यावा. जिल्हा परीषदेमार्फत ७५ शेतकरी कुटूंब दत्तक घेऊन त्यांना शासकीय योजनांचा लाभ देत त्यांना सक्षम व स्वावलंबी बनविण्यात येणार असल्याचेही ते म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!