*कोंकण एक्सप्रेस*
*शक्तीपीठ महामार्गासंदर्भात फुकेरी ग्रामस्थांकडून सूचना व निवेदन सादर….*
*दोडामार्ग : शुभम गवस*
प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाच्या अनुषंगाने फुकेरी येथील ग्रामस्थांनी भूसंपादन अधिकारी तथा उपविभाग अधिकारी, दोडामार्ग-सावंतवाडी यांच्याकडे निवेदन सादर केले आहे.
निवेदनामध्ये गावातील काही सर्वे क्रमांकांमधील जमिनींच्या संदर्भात विविध सूचना व मुद्दे मांडण्यात आले आहेत. महामार्गाच्या आराखड्याबाबत अधिक माहिती उपलब्ध करून देण्याबरोबरच स्थानिक नागरिकांच्या शंकांचे निरसन करण्याची विनंती करण्यात आली आहे.
तसेच संभाव्य मार्ग, सर्व्हिस रोडची सुविधा, जमिनींच्या मोजणीची प्रक्रिया आणि इतर प्रशासकीय बाबींबाबत सविस्तर माहिती देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. यासाठी प्रशासनाने गावस्तरावर बैठक आयोजित करावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
निवेदनामध्ये फुकेरी परिसरातील ऐतिहासिक व पर्यटनदृष्ट्या महत्त्वाच्या स्थळांचाही उल्लेख करण्यात आला असून विकासकामे राबविताना या बाबींचा विचार करण्यात यावा, असे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, ग्रामस्थांनी सादर केलेल्या निवेदनाची संबंधित विभागाकडून दखल घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.

