*कोंकण एक्सप्रेस*
*आदरणीय मोदीजींच्या १२ वर्षांच्या कार्यकाळात ‘हिंदू समाज’ आणि ‘देश’ सुरक्षित; भाजपची सिंधुदुर्गात पत्रकार परिषद!*
*कणकवली ः संजना हळदिवे*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीचा लेखाजोखा मांडण्यासाठी आणि भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवी चव्हाण यांच्या सूचनेनुसार सिंधुदुर्ग जिल्ह्यात विशेष पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेत बोलताना भाजप प्रवक्त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील १२ वर्षांच्या कार्यकाळात देशात झालेले ऐतिहासिक परिवर्तन, हिंदू समाजाला मिळालेली सुरक्षितता आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताचा वाढलेला मान-सन्मान यावर सविस्तर प्रकाश टाकला.
२०१४ पूर्वीचे तुष्टीकरणाचे राजकारण आणि भीतीचे वातावरण
पत्रकार परिषदेत बोलताना सांगण्यात आले की, “२०१४ च्या पूर्वी देशात काँग्रेसच्या राजवटीत केवळ तुष्टीकरणाचे राजकारण चालत होते. बहुसंख्य हिंदू समाजाला आपल्या हक्काच्या भावना व्यक्त करताना भीती वाटायची. ‘गर्व से कहो हम हिंदू है’ असे म्हणायलाही लोक घाबरत होते. हिंदू सणांवर सर्रास बंदी घातली जात होती आणि देशातील संपूर्ण प्रशासन व निर्णय केवळ अल्पसंख्याकांना केंद्रबिंदू ठेवून घेतले जात होते. तत्कालीन पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री धार्मिक स्थळांना भेटी देण्यास, कपाळावर टिळक लावण्यासही कचरत होते.”
मोदी सरकारच्या कार्यकाळातील ऐतिहासिक निर्णय व हिंदू अस्मितेचे पुनरुज्जीवन
२०१४ नंतर देशाचे नेतृत्व एका खऱ्या राष्ट्रभक्त स्वयंसेवकाच्या हाती आले आणि त्यानंतर देशाचे चित्र पूर्णपणे बदलले, असा दावा भाजपच्या वतीने करण्यात आला. या कार्यकाळातील प्रमुख ठळक मुद्दे खालीलप्रमाणे मांडण्यात आले:
भव्य राम मंदिर आणि धार्मिक स्थळांचा विकास: अयोध्या येथे प्रदीर्घ काळ प्रलंबित असलेले भव्य राम मंदिर आज दिमाखात उभे राहिले असून प्रत्येक हिंदूला रामलल्लाचे दर्शन घेण्याची सुवर्णसंधी मिळाली आहे. याशिवाय काशी विश्वनाथ, उज्जैनचे महाकालेश्वर अशा असंख्य धार्मिक क्षेत्रांचा कायापालट करून जागतिक पातळीवर धार्मिक पर्यटनाला मोठी चालना देण्यात आली आहे.
हक्काच्या जमिनी आणि वक्फ कायद्यात सुधारणा: २०१४ पूर्वी वक्फ सारख्या कायद्यांमधील त्रुटींचा गैरवापर करून हिंदू समाजाच्या जमिनी बळकावल्या जात होत्या. मोदी सरकारने कायद्यात आवश्यक सुधारणा (अमार्टमेंट) करून हिंदू समाजाला त्यांच्या हक्काच्या जमिनी परत मिळवून देण्याचे ऐतिहासिक आणि पुण्यकर्म केले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर हिंदू संस्कृतीचा सन्मान: आज देशाचे पंतप्रधान जगात कुठेही गेले तरी आपली हिंदू ओळख लपवत नाहीत, तर अभिमानाने मंदिरात जाऊन पूजा करतात. परदेशी राष्ट्रप्रमुखांचे स्वागत करताना ‘भगवद्गीता’ भेट देण्याची नवी आणि अभिमानास्पद प्रथा मोदीजींनी सुरू केली आहे.
दहशतवादाला चोख प्रत्युत्तर आणि राष्ट्रीय सुरक्षा
२०१४ पूर्वीच्या २६/११ सारख्या दहशतवादी हल्ल्यांची आणि ट्रेनमधील बॉम्बस्फोटांची आठवण करून देत प्रवक्त्यांनी सांगितले की, पूर्वीचे काँग्रेस सरकार पाकिस्तानसमोर लोटांगण घालत होते. मात्र, आज मोदीजींच्या कणखर नेतृत्वामुळे पाकिस्तान असो वा कोणतीही जिहादी मानसिकता असलेली संघटना, भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कोणाचीही हिंमत होत नाही. ‘ऑपरेशन सिंधू’ सारख्या कठोर पावलांतून भारताने शत्रूला चोख इशारा दिला आहे. आज बांगलादेश किंवा पाकिस्तानमधील हिंदू असो, प्रत्येकाला माहिती आहे की त्यांच्यासाठी सर्वात सुरक्षित देश केवळ भारतच आहे.
तीन महासत्तांच्या यादीत भारताचा समावेश!
तुष्टीकरणाचे आणि मतपेढीचे राजकारण बाजूला सारून मोदी सरकारने देशाला आर्थिक आणि सामरिक दृष्ट्या मजबूत केले आहे. आज जगातील पहिल्या तीन आर्थिक महासत्तांच्या यादीत अमेरिका आणि भारताचे नाव अग्रक्रमाने घेतले जात आहे. ‘लव्ह जिहाद’ विरोधी प्रशासकीय भूमिका, समान नागरी कायद्याची दिशा आणि राष्ट्रीय अस्मितेचा आदर यामुळे आज देशात प्रत्येक नागरिक खुल्या आणि सुरक्षित वातावरणात जगत आहे. येत्या काळातही पंतप्रधान मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारत देश प्रत्येक क्षेत्रात जगात पहिल्या क्रमांकावर राहील, असा ठाम विश्वास या पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आला.

