*कोंकण एक्सप्रेस*
*कणकवलीत १ कोटींचे ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ साकारणार; १५ जून रोजी होणार दिमाखदार भूमिपूजन!*
*नगराध्यक्ष संदेश पारकर यांची माहिती; लहान मुलांचे खेळ, ओपन जिम आणि वॉकिंग ट्रॅकसह मिळणार आधुनिक सुविधा*
*कणकवली ः संजना हळदिवे*
कणकवली नगरपंचायतीच्या वतीने शहराच्या वैभवात भर घालणारा एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून निम्मेवाडी येथे सुमारे १ कोटी रुपये खर्चाचे भव्य ‘श्री स्वयंभू नमो उद्यान’ साकारण्यात येणार आहे. या उद्यानाचा भूमिपूजन सोहळा सोमवार, १५ जून रोजी सकाळी ११ वाजता संपन्न होणार असल्याची माहिती कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष दालनात आयोजित या पत्रकार परिषदेला उपनगराध्यक्ष सुशांत नाईक, नगरसेवक रुपेश नार्वेकर, संकेत नाईक, जयेश धुमाळे, लुकेश कांबळे आणि नगरसेविका दीपिका जाधव आदी उपस्थित होते.
साडेआठ गुंठ्यांत साकारणार विरंगुळ्याचे केंद्र
निम्मेवाडी व सुतारवाडी परिसरातील नगरपंचायतीच्या आरक्षित जागेतील ८.५ गुंठे क्षेत्रात हे स्वयंभू नमो उद्यान उभारले जाणार आहे. या उद्यानामुळे केवळ परिसराच्या सौंदर्यात भर पडणार नसून नागरिकांना विरंगुळ्यासोबतच आरोग्यदायी उपक्रमांसाठी एक हक्काची जागा मिळणार आहे.
उद्यानातील प्रमुख वैशिष्ट्ये आणि सुविधा:
बालगोपाळांसाठी मनोरंजन: लहान मुलांसाठी विविध प्रकारची आधुनिक खेळणी आणि साहित्य.
आरोग्य आणि फिटनेस: नागरिकांच्या आरोग्यासाठी सुसज्ज ‘ओपन जिम’ आणि स्वतंत्र ‘वॉकिंग ट्रॅक’.
योगसाधना: योगाभ्यासासाठी शांत व स्वतंत्र जागेची व्यवस्था.
सांस्कृतिक व्यासपीठ: छोट्या कार्यक्रमांसाठी स्वतंत्र व्यासपीठ (स्टेज) उभारण्यात येणार आहे.
’या’ परिसरातील नागरिकांना होणार थेट फायदा
या आधुनिक उद्यानाचा लाभ निम्मेवाडीसह सुतारवाडी, बांधकरवाडी, सिद्धार्थनगर, माऊलीनगर आणि इतर परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणावर होणार आहे. या उद्यानामुळे परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून शहरातील इतर प्रलंबित विकासकामांनाही आता अधिक गती मिळेल, असा विश्वास नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी व्यक्त केला.
”शहर विकास आघाडीला सदैव मदत करणाऱ्या सर्व प्रमुख नेतेमंडळींना या भूमिपूजन सोहळ्यासाठी निमंत्रित करण्यात आले आहे. या सोहळ्यानंतर लगेचच इतर विकासकामांनाही सुरुवात केली जाईल. तरी शहर विकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आणि परिसरातील नागरिकांनी या भूमिपूजन समारंभाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे.”
— संदेश पारकर (नगराध्यक्ष, कणकवली)

