माजी आमदार वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे…

माजी आमदार वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे…

*कोंकण एक्सप्रेस*

*माजी आमदार वैभव नाईक यांनी आत्मपरीक्षण करावे…*

*महेश कांदळगावकर; मत्स्यालय निधी परत जाण्यास तत्कालीन लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा कारणीभूत…*

*मालवण ः प्रतिनिधी*

मत्स्यालयाचा निधी परत का गेला, हा प्रश्न माजी आमदार वैभव नाईक यांनी प्रशासनाला विचारण्यापेक्षा स्वतःलाच विचारणे अधिक सयुक्तिक ठरेल. प्रशासकीय दिरंगाई आणि तत्कालीन लोकप्रतिनिधींच्या पाठपुराव्याचा अभाव यामुळेच मालवणच्या विकासाचा हा महत्त्वाचा निधी परत गेला आहे,” अशी घणाघाती टीका माजी नगराध्यक्ष तथा स्वीकृत नगरसेवक महेश कांदळगावकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

कांदळगावकर यांनी म्हटले आहे की, आमचा लोकप्रतिनिधी म्हणून कार्यकाळ २०२१ मध्ये संपला. त्यानंतर प्रशासकीय राजवट सुरू झाली. याच काळात (२०२१ ते २०२४) वैभव नाईक हे आमदार म्हणून कार्यरत होते. तत्कालीन प्रशासक संतोष जिरगे यांच्या मनमानी कारभाराबाबत आम्ही वारंवार आवाज उठवला, सोशल मीडिया आणि वर्तमानपत्रांतून भूमिका मांडली. मात्र, नाईक यांनी त्यावेळी प्रशासकावर अंकुश ठेवला असता, तर आज मत्स्यालयाचा निधी परत जाण्याची नामुष्की आली नसती.

मत्स्यालय जागेच्या भूसंपादनाचा विषय आमच्या काळात मार्गी लावण्याचा प्रयत्न झाला होता. जागा मालकांशी बैठकाही झाल्या होत्या. मात्र, प्रशासकीय काळात पाठपुरावा न झाल्याने हा निधी नियमानुसार शासनाकडे परत गेला. भाजी मार्केटचे सीआरझेड परवानगीमुळे हे काम रखडले होते. प्रशासकीय राजवटीच्या ३-४ वर्षांत हा प्रश्न सुटला नाही. आता आमदार निलेश राणे यांनी पहिल्याच बैठकीत हा विषय घेतल्याने परवानगीची प्रक्रिया अंतिम टप्प्यात आहे.

नगर परिषद सफाई कामगारांच्या इमारतीबाबत प्रशासक जिरगे यांनी शासन पत्रांना मुदतीत उत्तरे दिली नाहीत किंवा आवश्यक ठराव केले नाहीत. जर तत्कालीन आमदारांनी लक्ष दिले असते, तर ही इमारत आज उभी राहिली असती. तसेच, पर्यकांसाठी घेतलेल्या बायोटॉयलेट गाड्या आणि कचरा खत निर्मिती मशिन प्रशासकीय काळात धूळ खात पडून राहिल्या. अखेर आमदार निलेश राणे यांनी निवडून आल्यावर स्वतःच्या खर्चाने या गाड्या आणि मशिन दुरुस्त करून दिल्या आहेत.

मच्छी मार्केटमधील गाळ्यांचे लिलाव आणि मुदत संपलेल्या भाड्याच्या इमारतींबाबत वेळेत निर्णय न झाल्याने नगरपरिषदेचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. त्यावेळी गप्प बसलेले नाईक आता सध्याच्या मुख्याधिकाऱ्यांना प्रश्न विचारून जनतेची दिशाभूल करत असल्याचा आरोप कांदळगावकर यांनी केला.

भुयारी गटार योजनेवरून होणाऱ्या आरोपांना उत्तर देताना कांदळगावकर म्हणाले, “आमच्या काळात आम्ही काम करून घेतले. मात्र, आमच्या नंतरच्या प्रशासकीय काळात कामाचा वेग शून्य असतानाही कोट्यवधींची बिले अदा केली गेली. जर कंत्राटदार चुकत होता, तर त्याला त्यावेळी का बदलले नाही? याचे आत्मपरीक्षण नाईक यांनी करावे.”

“मागच्या चुकांचे खापर नूतन मुख्याधिकारी किंवा सध्याच्या सत्ताधाऱ्यांवर फोडणे चुकीचे आहे. सध्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार नारायण राणे, आमदार निलेश राणे आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून मालवण नगरपरिषदेला कोट्यवधींचा निधी प्राप्त होत आहे. वर्षाच्या अखेरीस हा विकास आकडा पाहून मालवणकर नक्कीच समाधानी होतील,” असा विश्वासही महेश कांदळगावकर यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!