*कोंकण एक्सप्रेस*
*सोशल मीडियाच्या युगात वाचनसंस्कृतीचे महत्त्व – प्राचार्य डॉ. सुभाष सावंत*
*दोडामार्ग – शुभम गवस*
आजच्या डिजिटल आणि वेगवान जीवनशैलीत विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर अभ्यासापासून दूर जात असून सोशल मीडिया, मोबाईल आणि व्हिडिओ गेम्सकडे अधिक आकर्षित होत आहेत. याचा त्यांच्या व्यक्तिमत्त्वावर, आचार-विचारांवर तसेच भविष्यातील प्रगतीवर विपरीत परिणाम होत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्यासाठी वाचनसंस्कृती रुजवणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सुभाष सावंत यांनी केले.
ते दोडामार्ग येथील लक्ष्मीबाई सीताराम हळबे महाविद्यालयात आयोजित सामूहिक वाचन उपक्रमात अध्यक्षस्थानावरून बोलत होते. नियमित वाचनामुळे विचारांची प्रगल्भता वाढते, जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोन व्यापक होतो आणि व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास साधता येतो, असे त्यांनी सांगितले.
या उपक्रमाचे उद्घाटन युवा पत्रकार व महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी समीर ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर पत्रकार संदेश देसाई, ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे, प्रा. डॉ. सोपान जाधव, प्रा. डॉ. पी. डी. गाथाडे, प्रा. डॉ. संजय खडपकर, प्रा. डॉ. प्रशांत ढेपे, प्रा. डॉ. राजेंद्र इंगळे, प्रा. दिलीप बर्वे, प्रा. रोहन बागकर, प्रा. यश गवस, प्रा. कु. दर्शनी कोटकर, प्रा. शेफाली गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
आज अनेक विद्यार्थी आवश्यक सवयी न अंगीकारता अनावश्यक गोष्टींमध्ये वेळ घालवतात. मात्र जीवनात प्रगती करायची असेल, आचार-विचारात सकारात्मक बदल घडवायचा असेल आणि सुसंस्कृत जीवन जगायचे असेल तर वाचन अत्यावश्यक आहे, असेही डॉ. सावंत यांनी ठामपणे नमूद केले.
यावेळी बोलताना पत्रकार समीर ठाकूर यांनी महाविद्यालयाच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. आजची तरुण पिढी पुस्तकांपासून दूर जात असल्याचे वास्तव असून अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल, असे त्यांनी सांगितले.
या सामूहिक वाचन उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापक व कर्मचारी यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. विविध विषयांवरील पुस्तके, आत्मचरित्रे तसेच सामाजिक व प्रेरणादायी साहित्याचे वाचन करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या बौद्धिक, नैतिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
या कार्यक्रमाचे आयोजन व नियोजन ग्रंथपाल डॉ. रामकिसन मोरे व कल्पेश गवस यांनी केले. कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते

