दोडामार्गमध्ये चोरीच्या घटनांमुळे व्यापारी संतप्त; पोलिसांना निवेदन

दोडामार्गमध्ये चोरीच्या घटनांमुळे व्यापारी संतप्त; पोलिसांना निवेदन

*कोंकण एक्सप्रेस*

*दोडामार्गमध्ये चोरीच्या घटनांमुळे व्यापारी संतप्त; पोलिसांना निवेदन*

*दोडामार्ग | शुभम गवस*

तालुका व शहर परिसरात सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे व्यापारी वर्गात तीव्र संताप व्यक्त होत असून, या प्रकारांविरोधात दोडामार्ग व्यापारी संघटनेने थेट पोलिस प्रशासनाला जाब विचारला आहे. व्यापारी संघटनेच्या वतीने पोलिस निरीक्षकांना निवेदन देत तात्काळ कठोर कारवाई, नियमित पोलिस गस्त व सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करण्याची ठोस मागणी करण्यात आली आहे.
गेल्या काही काळात दुकानफोडी, घरफोड्या व माल चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्यापारी तसेच नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असुरक्षिततेची भावना कायम राहिल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा स्पष्ट इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
निवेदनात रात्रीच्या वेळी पोलिस गस्त वाढवणे, संशयितांवर कडक नजर ठेवणे, बाजारपेठ व वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने सुरू करणे, तसेच चोरीच्या घटनांचा तात्काळ छडा लावून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागण्या मान्य न झाल्यास व्यापारी संघटना अधिक आक्रमक भूमिका घेईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
या निवेदनावर दोडामार्ग व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या सह्या असून, प्रशासनाने तात्काळ ठोस पावले उचलावीत, अन्यथा जनआक्रोश उफाळून येईल, असा इशारा देण्यात आला आहे.
यावेळी व्यापारी सागर शिरसाट, संतोष नानचे, वैभव इनामदार, भूषण सावंत, सुदेश मळीक, राजेश सावंत, श्याम चांदेलकर, बंटी मोरजकर, अनिल सांबारी, ओंकार पेडणेकर, फोंडू हडीकर, बाळू गावडे, श्री. मयेकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!