*कोंकण एक्सप्रेस*
*समीर नलावडे यांच्या अर्जावर घेतलेली हरकत फेटाळली ; अँड. राजेंद्र रावराणे यांनी यशस्वी युक्तिवाद केल्याने पारकर यांचा आक्षेप फेटाळला*
*कणकवली ः संजना हळदिवे*
भाजपचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार समीर नलावडे हे निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याची हरकत आघाडीचे उमेदवार संदेश पारकर यांनी घेतली होती. मात्र सुनावणी अंती ही हरकत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी फेटाळली आहे.
नलावडे यांना एका गुन्ह्यामध्ये शिक्षा झाली असल्यामुळे ते निवडणूक लढविण्यास अपात्र असल्याचे पारकर यांनी निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्या निदर्शनास आणले. मात्र नलावडे यांच्यातर्फे अँड. राजेंद्र रावराणे यांनी यशस्वी युक्तिवाद केल्याने पारकर यांचा आक्षेप फेटाळला गेला आहे. नलावडे यांच्यातर्फे युक्तिवाद करताना अँड. राजेंद्र रावराणे यांनी उच्च व सर्वोच्च न्यायालय निकालपत्र निवडणक निर्णय अधिकारी श्री देशपांडे यांच्याकडे सादर केले.
नलावडे यांनी जिल्हा न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात अपील केले आहे. तर उच्च न्यायालयाने नलावडे यांच्या शिक्षेला सध्या स्थगिती दिली आहे. शिक्षेला स्थगिती दिली असल्यास निवडणूक लढवता येते, असे आपण निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्याचे अँड रावराणे म्हणाले. त्यानुसार पारकर यांची हरकत फेटाळली गेली आहे, असेही रावराणे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

