*कोंकण एक्सप्रेस*
*नरकासूर स्पर्धेतील बक्षिसाच्या रक्कमेचा उपयोग वृद्धाश्रमासाठी*
*वेंगुर्ल्यातील जबरदस्त मित्रमंडळाचा स्तुत्य उपक्रम*
*वेंगुर्ला प्रतिनिधी (प्रथमेश गुरव)*
– नरकासूर स्पर्धेत मिळालेल्या बक्षिसाची रक्कम आणि मंडळाच्या दात्यांनी केलेल्या अर्थसहाय्यातून सुमारे १६ हजार रूपये किमतीचे जीवनावश्यक वस्तू जबरदस्त मित्रमंडळाने पिगुळी येथील जिव्हाळा सेवाश्रम या वृद्धाश्रमाला देणगीदाखल दिल्या आहेत. बक्षिसाची रक्कम इतरत्र खर्च न करता ती वृद्धाश्रमच्या सहकार्यासाठी वापरत जबदरस्त मित्रमंडळाने समाजासमोर नवा आदर्श उभा केला आहे.
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर वेंगुर्ला शहरात नरकासूर स्पर्धेचे आयोजन केले होते. यात सामाजिक, आरोग्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्य करणा-या वेंगुर्ला-राऊळवाडा येथील जबरदस्त सांस्कृतिक कला क्रीडा मंडळाने आपला भव्यदिव्य नरकासूर सहभागी केला होता. त्यात त्यांच्या नरकासूराच्या प्रतिमेला मोठ्या गटातून द्वितीय क्रमांकाचे १२ हजार रूपयांचे बक्षिस मिळाले. मिळालेल्या बक्षिसाची रक्कम अन्यत्र खर्च न करता त्याचा उपयोग वृद्धाश्रमासाठी करण्याचे एकमताने मंडळाने ठरविले. त्यानुसार त्या १२ हजार रक्कमेसोबतच मंडळातील दानशूर सदस्यांनी सुमारे ४ हजार रूपयांची मदत केली. एकूण १६ हजार रूपये किमतीच्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करून त्या पिगुळी येथील जिव्हाळा या वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुरेश बिर्जे यांच्याकडे सुपूर्द केल्या.
यावेळी जबरदस्त मित्रमंडळाचे कार्यकर्ते अजित राऊळ, विवेक राऊळ, ज्ञानेश्वर रेडकर, स्वप्निल पालकर, निखिल नाईक, हर्षद रेडकर, संकेत म्हापणकर, सौरभ भोसले, अरूण माडये, रूपेश सावंत, नचिकेत माडये, निखिल भाटकर, अस्मिता राऊळ, साई राऊळ, प्रांजल वेंगुर्लेकर, नयना पालकर, अरूणा माडये, अक्षया राऊळ, बापू वेंगुर्लेकर, आर्यन शिरसाट आदी उपस्थित होते.
सामाजिक क्षेत्रात कार्य करत असतानाच आपण या समाजाचे देणे लागतो या भावनेने जबरदस्त मित्रमंडळाने वृद्धाश्रमाला मदत करून राबविलेला उपक्रम हा स्तुत्य आहे. मंडळाने यापुढेही समाजातील गरजूंना आवश्यक ती मदत करावी असे आवाहन सुरेश बिर्जे यांनी उपस्थितांना केले. सामाजिक, सांस्कृतिक आणि रक्तदानसारख्या उपक्रमात नेहमी अग्रेसर असलेल्या जबरदस्त मित्रमंडळाच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल समाजातून त्यांचे कौतुक होत आहे.

