*कोंकण एक्सप्रेस*
*संजू परब भविष्यात विधानसभेत गेलेच पाहीजेत : निलेश राणे*
*केसरकरांसारखे वागण्यात मजा, माझा स्वभावही बदलला त्याचा नक्कीच फायदा झाला…*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
संजू परबांमध्ये “क्वालिटी” आहे. त्यांना जी आतपर्यंत पद मिळालेत ती त्यांच्या कर्तृत्वामुळे मिळाली आहेत. त्यामुळे त्यांच्यासह दत्ता सामंत यांच्यासारखी माणसे विधानसभेत गेलीच पाहिजेत, अशा शुभेच्छा शिवसेनेचे नेते तथा आमदार निलेश राणे यांनी आज येथे दिल्या. दरम्यान आमदार दीपक केसरकर यांच्या सारखी वागण्यात मजा आहे. गेल्या काही महिन्यात माझा स्वभाव भी बदलला. त्यामुळे त्याचा मला निश्चितच फायदा झाला. १० वर्षे राजकारणापासून दूर राहून अनेक गोष्टी शिकलो, असेही ते म्हणाले.
शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संजू परब यांचा वाढदिवस आज येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आल. यावेळी श्री. राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी यावेळी आमदार दीपक केसरकर, शिवसेना उपनेते सचिन आंग्रे, जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, जिल्हा समन्वयक सचिन वालावलकर, संजय पडते, महिला जिल्हा आघाडी अध्यक्षा अॅड. निता कविटकर, विधानसभा प्रमुख प्रेमानंद देसाई, माजी जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, तालुका प्रमुख बबन राणे, नितीन मांजरेकर, गणेशप्रसाद गवस, शहर प्रमुख बाबू कुडतरकर, उपजिल्हाप्प्रमुख झेवियर फर्नाडीस, क्लॅटस फर्नाडिस, बंटी पुरोहित, सुथा कवठणकर, प्रशांत साटेलकर यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.
ते म्हणाले, संजू परब यांच्या वाढदिवस कार्यक्रमासाठी मी कधीही वेगळ्या आमंत्रणाची वाट पाहत नाही, कारण तो माझ्या घरचाच माणूस आणि माझा भाऊच आहे. त्याच्या व माइयातील ऋणानुबंध वेगळेच आहेत, माझ्या प्रत्येक बऱ्या-वाईट प्रसंगात तो माझ्या सोबत ठाम राहिला आहे. माझ्या प्रत्येक निर्णयात त्याने मला कायम साथ दिली आहे. त्यामुळे कधी कधी काही राजकीय खेळी होत असल्या तरीही संजू मला सोडून कधीही दूर जाऊ शकत नाही, अशा शब्दांत संजू परब यांच्या कामाची तळमळ, निष्ठा आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचे त्यांनी कौतुक केले. ते पुढे म्हणाले, मी गेल्या १६ वर्षांपासून दरवर्षी संजू परब यांच्या वाढदिवसासाठी सावंतवाडीत येतो. राजकारणामध्ये चढ-उतार असूनही, पराभवांना तोंड देऊनही, संजू परब माझ्यासोबत खंबीरपणे उभे राहिले. त्यांच्यासारखी प्रामाणिक, निस्वार्थ माणसे माझ्यासोबत का राहिली, हे आजही मला कळले नाही. त्यांच्याकडे अनेक गुण आहेत आणि त्यांच्या कर्तृत्वानेच त्यांना भविष्यात अनेक पदे मिळतील, याची मला खात्री आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
संजू परब यांच्याकडे नेतृत्व करण्याची कला आहे, आणि ती योग्यरित्या वापरली गेली पाहिजे. त्यांचे योग्य नियोजन तळगाळात पोहोचावे यात संजूचा हात कोणी धरू शकत नाही. त्याला नेहमीच आमची साथ आहे व राहणार. राजकारणात संजू परब म्हणजे माझा माणूस. मला विचारल्याशिवाय तो कोणताही मोठा निर्णय घेत नाही. त्याला कितीही ऑफर्स आल्या तरी तो सर्वात आधी मला फोन करतो. आमच्या दोघांचे जीवाभावाचे नाते आहे. तो माझा भाऊच आहे. राजकारणात निलेश राणेंचे नाव कधीही खाली पडू नये यासाठी संजू परबने स्वतः बदनाम होणे स्वीकारले, पण निलेश राणेंची बदनामी कधी होऊ दिली नाही, असे सांगत श्री. राणे यांनी संजू परब यांच्या निष्ठेची प्रशंसा केली.

