*कोकण Express*
*आताच्या राजकर्त्यांनी वैचारिक दृष्ट्या देश अनेक वर्ष मागे नेला*
*समाज साहित्य प्रतिष्ठान आयोजित साहित्य विचार आणि सन्मान संमेलनात नाटककार प्रेमानंद गज्वी यांचे प्रतिपादन*
*सुबोध मोरे, प्रा.विवेक कुडू, प्रा.एकनाथ पाटील, ऍड. संदीप निंबाळकर यांचा सन्मान*
*सावंतवाडी/ प्रतिनिधी*
कलावंत आणि साहित्यिक समाज व देश वैचारिक दृष्ट्या एक, एक पाऊल पुढे घेऊन जात असतात. मात्र अलीकडले सत्ताधारी राजकीय लोक समाजाला आणि देशाला मागे मागे घेऊ जात आहेत. आताच्या सत्ताधाऱ्यांनी देशाला अनेक वर्ष मागे नेले असे स्पष्ट प्रतिपादन जेष्ठ नाटककार प्रेमानंद गज्वी यांनी सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या समाज साहित्य प्रतिष्ठान आयोजित दुसऱ्या साहित्य विचार आणि सन्मान संमेलनात केले.
सावंतवाडी श्रीराम वाचन मंदिराच्या सभागृहात श्री गज्वी यांच्या अध्यक्षतेखाली हे संमेलन आयोजित करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी आपण कोणत्या काळात कोणत्या प्रकारचे साहित्य लिहितो हे महत्त्वाचे असून अशा साहित्याचा विचार करणाऱ्या साहित्यिकांना आणि समाजाप्रती निष्ठेने सामाजिक काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांनाही समाज साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार देऊन गौरवीत आहे. हे योग्य काम प्रतिष्ठान करत आहे, असेही आग्रहाने सांगितले. यावेळी गज्वी यांच्या हस्ते दहा हजार रुपये स्मृतीचिन्ह शाल आणि ग्रंथ भेट अशा स्वरूपाचा इतिहासकार गुरुवर्य कृष्णराव अर्जुन केळुसकर समाज पुरस्कार ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुबोध मोरे यांना तर काशीराम आत्माराम साटम स्मृति समाज साहित्य कथा पुरस्कार कथाकार विवेक कुडू यांना आणि प्रकाश रामचंद्र रसाळ स्मृति भूमी काव्य पुरस्कार कवी एकनाथ पाटील यांना देऊन गौरविण्यात आले. तर ऍड संदीप निंबाळकर यांचा प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते त्यांच्या सामाजिक योगदानाबद्दल विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी समाज साहित्य प्रतिष्ठानचे संस्थापक कवी अजय कांडर, प्रतिष्ठानचे विद्यमान अध्यक्ष मधुकर मातोंडकर, सत्कारमूर्ती सामाजिक कार्यकर्ते ऍड संदीप निंबाळकर संस्थेचे, सदर संमेलनातील कवी संमेलनाचे अध्यक्ष कवी मोहन कुंभार संस्थेचे इतर पदाधिकारी विजय सावंत, प्रमिता तांबे, प्रियदर्शनी पारकर, मनीषा पाटील, संतोष जोईल आदी उपस्थित होते
श्री गज्वी म्हणाले लेखक म्हणून आपलं भान सतत जागृत ठेवायला हवं.असाच लेखक वर्तमान काळात लेखक म्हणून जगत असतो. महाभारत, रामायण आणि इतिहासातल्या गोष्टी सांगून साहित्य लेखन करायचं असेल तर ते लेखन कशाला करा ? यासाठी त्या त्या इतिहासाचे ग्रंथ वाचले तरी पुरेसे आहे. आज आपण काय जगतो आहोत, त्या जगण्याचे परिणाम आजूबाजूच्या माणसांवर, समाजावर काय होत आहेत? त्यातून समाज कुठल्या स्तराला जातो आहे, याचा शोध लेखकाने घ्यायला हवा. प्रवीण बांदेकर सारख्या कादंबरीकाराने 2014 नंतरच्या घटनांवर कादंबरी लिहिली मला हे फार महत्त्वाचे वाटते. लेखकाकडे अशी दृष्टी असायला हवी. नाहीतर तो लिहिता लिहिता संपून जाण्याची शक्यता असते. कधी नव्हे एवढा माणूस आता अधिक जाती आणि धर्मात विभागला गेला आहे. याला आताचे राजकीय सत्ताधारी लोकही जबाबदार आहेत. अशा लोकांकडे आपली बुद्धी गहाण ठेवणे हे एकूण समाजासाठी घातक आहे. लेखक कलावंत या सगळ्याला भेदून पुढे जात असतो। म्हणूनच त्यांच्यामुळे वैचारिक दृष्ट्या देश पुढे जात असतो. मात्र आताच्या राज्यकर्त्यांनी देश वैचारिक दृष्ट्या अनेक वर्ष मागे नेला. पण या सगळ्याची आपल्याला काही खंत नाही एवढं आपलं मन बधिर झाल आहे. मेंदू आणि मन बधीर होणं हे समाजाच्या बौद्धिक वाढीसाठी फार धोकादायक असत. लेखकाला चांगले लिहायचं असेल तर आजूबाजूच्या घटनांचा शोध घेऊन समाजातील विद्रुपता शोधायला हवी.
सुबोध मोरे म्हणाले इतिहासकार कृष्णराव अर्जुन केळुसकर हे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र.त्यांच्या नावाने देण्यात येणारा पुरस्कार मला देण्यात आला यापेक्षा माझा दुसरा मोठा सन्मान नाही. मी सतत रस्त्यावरच्या लोकांसाठी संघर्ष करत राहिलो आणि अशा लोकांचं लेखन करणाऱ्या लेखकांनाही समाज साहित्य प्रतिष्ठान पुरस्कार देऊन गौरविते या मागची समाज साहित्य प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांची दृष्टी आहे. अशी दृष्टी साहित्य चळवळीला अपवादाने लाभते. विवेक कुडू म्हणाले, समाज साहित्य प्रतिष्ठानचा समाज साहित्य कथा पुरस्कार हा माझ्या आयुष्यातील पहिला पुरस्कार आहे.मी कमी लेखन करतो.परंतु मला जे वाटते तेच मी लिहितो. आणि अशा कथा लेखनाला मराठीतल्या जाणकार साहित्यिकांनी प्रतिसाद दिला आणि हा आता मराठी साहित्यातला महत्त्वाचा पुरस्कार मला मिळाला याचा आनंद होत आहे. एकनाथ पाटील म्हणाले, महाराष्ट्रातील धुरंदर नेते एन डी पाटील यांच्यावरच्या दीर्घ कवितेला समाज साहित्य प्रतिष्ठानचा भूमिकाव्य पुरस्कार मिळाला, हा माझा मोठा गौरव आहे.समाज साहित्य प्रतिष्ठान विचाराची बांधिलकी स्वीकारून काम करत आहे. म्हणूनच अशी दिग्गज माणसे या कार्यक्रमाला येऊ शकली. हौशीने साहित्यिक कार्यक्रम आयोजित करणे आणि वैचारिक दृष्ट्या कार्यक्रम आयोजित करणे यात फरक असतो. अशा कार्यक्रमालाही इथे भरपूर प्रतिसाद मिळाला ही कायम लक्षात राहणारी घटना आहे.
यावेळी कवी अजय कांडर यांनी कार्यक्रमा मागील प्रतिष्ठांची भूमिका विशद केली. प्रियदर्शनी पारकर यांनी सूत्रसंचालन केले. मनीषा पाटील यांनी प्रस्तावना केली. यावेळी मधुकर मातोंडकर यांच्या हस्ते श्री गज्वी यांचा सत्कार करण्यात आला. प्रमिता तांबे यांनी आभार व्यक्त केले. तर विजय सावंत, संतोष जोईल यांनी स्वागत केले

