*कोकण Express*
*कवी प्रा.संतोष जोईल यांच्या काव्यसंग्रहाचा २७ रोजी फोंडाघाट येथे प्रकाशन सोहळा*
*कवी अजय कांडर यांच्या हस्ते प्रकाशन तर मानसी माजगावकर,दीपक माजगावकर, वैभव साटम, मधुकर मातोंडकर, प्रा. रुपेश पाटील यांची प्रमुख उपस्थिती*
*फोंडाघाट/प्रतिनिधी*
फोंडाघाट जुनियर कॉलेजचे प्रा. संतोष जोईल यांच्या प्रभा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या “काहीच सहन होत नाही” या काव्यसंग्रहाचा प्रकाशन सोहळा रविवार 27 नोव्हेंबर रोजी सकाळी १० वा. कला व वाणिज्य महाविद्यालय सभागृह फोंडाघाट येथे आयोजित करण्यात आला आहे.या प्रकाशन सोहळ्यात कवी अजय कांडर यांच्या हस्ते सदर काव्यसंग्रहाचे प्रकाशन करण्यात येणार असल्याची माहिती फोंडाघाट ज्युनिअर कॉलेजचे प्राचार्य एम.ए. सावंत यांनी दिली.
सावंतवाडी येथील उद्योजक मानसी माजगावकर आणि दीपक माजगावकर यांच्या हस्ते सदर कार्यक्रमाचे उद्घघाटन होणार असून यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रसिद्ध ललित लेखक प्रा. वैभव साटम (मुंबई) आणि समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे अध्यक्ष कवी मधुकर मातोंडकर, कवी प्रा.रुपेश पाटकर (सावंतवाडी) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. कवी प्रा. संतोष जोईल हे गेली अनेक वर्ष निष्ठेने काव्य लेखन करत असून ते समाज साहित्य प्रतिष्ठान सिंधुदुर्गचे सांस्कृतिक कार्यकर्ते म्हणून कार्यरत आहेत. “काहीच सहन होत नाही” या काव्यसंग्रहाला तरुण समीक्षक प्रा जिजा शिंदे (औरंगाबाद) यांची अभ्यासपूर्ण प्रस्तावना लाभली असून त्यात ते म्हणतात,कवी संतोष जोईल यांच्या कवितेतून आलेले जीवनानुभवाचे दर्शन, सर्वहारा माणसाची घुसमट, सभोवताचे कठोर वास्तव, सामाजिक जाणिवा, मानवी मूल्यांची होणारी पडझड उद्ध्वस्त झालेली
स्वप्न,उराशी बाळगलेला
आशावाद,जीवनदृष्टीचा ,मूल्यभानांचा कवितेतून व्यक्त झालेला विचार अशा कितीतरी आशयाचे पदर काव्यसंग्रह वाचताना दिसून येतात. एकूणच समकालीन आणि सभोवतालच्या वास्तवाचा अधिक धीटपणे वेध घेणारी ही कविता एका सार्वत्रिक अनुभवाला शब्द रूप देते आणि माणसाचे गीत अंत:करणातून गाते. म्हणूनच कवी संजय जोईल यांची ही कविता आपण स्वीकारायलाच हवी. तरी या कार्यक्रमात साहित्य रसिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राचार्य सावंत यांनी केले आहे.

