*कोकण Express*
*शिवसेनेने कणकवली नगर वाचनालयाची दुरावस्था जनतेसमोर आणली*
*नगर वाचनालय हे अराजकीय, साहित्यिक व्यासपीठ,तेथे राजकीय हस्तक्षेपेची गरज नाही*
*दुरवस्थेबाबत न बोलता मेघा गांगण यांनी हवेत गोळीबार करू नये*
*नगरसेवक रुपेश नार्वेकर यांचा टोला*
*कणकवली ः संंजना हळदिवे*
कणकवली नगर वाचनालयाची दुरावस्था शिवसेनेने जनतेसमोर आणली. नगर वाचनालय हे अराजकीय, साहित्यिक व्यासपीठ आहे. तेथे राजकीय हस्तक्षेप असण्याची गरज नाही. त्यामुळे या दुरवस्थेबाबत न बोलता मेघा गांगण यांनी हवेत गोळीबार करू नये. नगर वाचनालय वाचवायचे असेल आणि दुरवस्थेबाबत जनाची नाही तर मनाची थोडीफार जरी लाज असेल तर राजकीय पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊन बाजूला होण्याची हिम्मत दाखवावी, असा टोला नगरसेवक रुपेश नार्वेकर यांनी हाणला आहे.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात श्री. नार्वेकर यांनी म्हटले आहे की, शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नगर वाचनालयाला भेट देऊन वाचनालयाच्या व्यवस्थेबाबत माहिती जाणून घेतली. आज पंचवीस हजार पुस्तके जागेअभावी बांधून ठेवलेली आहेत ती वस्तुस्थिती नाही आहे का? गेल्या चार वर्षापासून नगर वाचनालय हॉलमध्ये आहे त्यामुळे हॉल भाड्याने देता येत नाही हे खरे नव्हे काय? या सहित शिवसेना शिष्टमंडळाने उपस्थित केलेल्या प्रश्नांवर काहीही भाष्य न करता नगर वाचनालयाच्या संचालक मेघा गांगण यांनी केवळ राजकीय टीका केली. नगर वाचनालयाची ही दुरावस्था बाजूला करून नगर वाचनालय नावारूपाला कसे आणता येईल याबाबत काहीच भाष्य त्यांनी केलेले नाही. नगर वाचनालयाची दुरावस्था दूर करण्यासाठी हे नगर वाचनालय विचारवंतांच्या ताब्यात असायला हवे. मात्र सर्व सत्ताकेंद्रे आपल्या ताब्यात हवी या हव्यासापोटी या नगर वाचनालयाची वाट लावण्याचे काम नगर वाचनालयाचे अध्यक्ष व पदाधिकारी यांनी केले आहे. म्हणूनच जे विचारवंत संचालक होते ते राजीनामा देऊन बाहेर पडले हे खोटे आहे का? नगर वाचनालयात आम्हालाही राजकारण करायचे नाही. पण आप्पासाहेब पटवर्धन यांनी स्थापन केलेले हे नगर वाचनालय अस्तित्वहीन बनले आहे. नगर वाचनालयाला आलेली अवकळा दूर होऊन हे वाचनालय पुन्हा एकदा नावारूपाला यावे एवढीच आमची माफक अपेक्षा आहे. म्हणूनच आजच्या अध्यक्ष संचालकांना जर खरोखरच नगर वाचनालय नावारूपास यावे असे वाटत असेल तर त्यांनी राजीनामा देऊन बाजूला व्हावे आणि अराजकीय साहित्यिकांना हे व्यासपीठ उपलब्ध करून द्यावे. दुसरी गोष्ट म्हणजे वाचनालयांना अनुदान देणे हा शासनाचा धोरणात्मक निर्णय आहे आणि तो राज्यासाठी लागू असतो. त्यामुळे त्या त्या संस्थांनी आपापले उत्पन्न कसे वाढवावे हे त्यांनी ठरवायचे असते. कणकवलीचे नगर वाचनालय दरवर्षी व्याख्यानमाला तसेच हॉल भाड्याने देऊन उत्पन्न वाढवत होते. मात्र गेल्या चार वर्षात यातले काहीच झालेले नाही. पगाराच्या बाबतीत बोलायचे तर राणे यांच्या कुठल्याही संस्थेत कर्मचाऱ्यांना पगार मिळत नाहीत. त्यामुळे त्यांचे कर्मचारी संस्था सोडून जातात. मात्र आप्पासाहेब पटवर्धन हे संस्थापक असलेल्या या नगर वाचनालयात तसे घडू नये असे जर त्यांना वाटत असेल तर त्यांनीच संस्थेतून बाजूला झाल्यास संस्था निश्चितच वाचेल यात कोणाच्याही मनात शंका नाही.

