चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला देवगड तालुक्यातील युवाई धावली

चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला देवगड तालुक्यातील युवाई धावली

*कोकण Express*

*चिपळूण पुरग्रस्तांच्या मदतीला देवगड तालुक्यातील युवाई धावली*

*देवगड ः अनिकेत तर्फे*

चिपळूणमध्ये आलेल्या महापुराने अनेकांचे संसार नेस्तनाबूत केले. संपूर्ण बाजारपेठच नव्हे तर घरदारेही पाण्याखाली बुडाली. या आस्मानी संकटाचा मुकाबला करणाऱ्या पूरबाधितांच्या मदतीला देवगड तालुक्यातील देवगड शहर, जामसंडे, गिर्ये, अनपूर गावातील विशी-बावीशीच्या संवेदनशील तरुणांनी थेट चिपळूनमध्येच धाव घेतली. चिपळूणमध्ये आलेल्या महापुराचे पाणी ओसरले असले तरी पुरबाधितांसमोर पुढे काय हा भलामोठा प्रश्न अजूनही आ वासून उभा आहे. कारण या जलप्रलयाने सगळेच होत्याचे नव्हते झालेय. घरादारांत, परिसरात सगळीकडे चिखलच चिखल आहे. विहिरी दूषित पाण्याने भरून गेल्यात. खायचे काय ? आणि प्यायचे काय ? हाही मोठा प्रश्न पूरग्रस्तांसमोर आहे.

चिपळूणमध्ये आलेल्या महापूरात बाधित झालेल्या पीडितांसाठी देवगड तालुक्यातील तरुणाई ने पुढाकार घेतला. एकविचाराने या तरुणांनी पुरबाधितांना लागणाऱ्या दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंसह पिण्यासाठी आवश्यक असणारी पाणी बॉटल खरेदी केली. या खरेदीसाठी या तरुणांनी स्वतः पदरमोड केलीच त्यासोबत काही देणगीदारांचीही त्यांना या कामी मदत झाली. त्यातून या तरुणांनी जीवनावश्यक वस्तूंचे 450 किट रात्रंदिवस जागत तयार केली. 1 आयशर आणि 1 चॅम्पर गाडी भरून हे सर्व साहित्य देवगड तालुक्यातील हे तरुण 29 जुलै रोजी भल्या पहाटे चिपळूण ला घेऊन गेले. आणि स्वतः दिवसभर गरजू व्यक्तींना त्याचे वाटपही त्यांनी केले. विशेष म्हणजे हे समाजकार्य करताना आपण मदत करतोय असा बडेजाव पणाचा कुठलाही लवलेश या तरुणांच्या मनात नव्हता. एवढेच नव्हे तर आम्ही जे केलं ते माणुसकी म्हणून केले. त्यामुळे ज्यांना ही मदत दिली त्या गावाचे नाव प्रसिद्धीला देणे म्हणजे त्यांची कीव करण्यासारखे होईल असा पोक्त आणि प्रगल्भ विचारही या युवकांनी बोलून दाखवला हे महत्वाचे आहे. मात्र अद्यापही चिपळूण मधील पुरबाधितांची अवस्था भयानक आहे.

त्यांना या संकटातून सावरण्यासाठी सढळ हस्ते मदतीची गरज आहे. ज्यांना जशी शक्य होईल त्या स्वरूपात यथाशक्ती ही मदत करा असे आवाहन या सर्व तरुणांच्या वतीने मुफीद बगदादी यांनी केले आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!