*कोकण Express*
*माडखोल धवडकी येथील नुकसानग्रस्त भागाला जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी दिली भेट*
*सावंतवाडी ः प्रतिनिधी*
माडखोल धवडकी येथे पुराच्या पाण्यामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी सायंकाळी केली.यावेळी नगराध्यक्ष संजू परब व शहर मंडल अध्यक्ष अजय गोंदावळे उपस्थित होते.गेले दोन दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे आज सावंतवाडी तालुक्यात पूरसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शिरशिंगे नदीला पूर आल्याने माडखोल, धवडकी येथील बाजारपेठेला पुराचा वेढा पडल्याने नदीकाठच्या घरांना, दुकान व्यावसायिकांना याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. जवळपास तीन फुटावर पाणी साचल्याने दुकानातील सामान भिजून गेले तर अनेकांच्या घरात पाणी शिरल्याने त्यांनी स्लॅबच्या वर तसेच पोटमाळ्याचा आधार घेतला होता. दरम्यान याबाबत माहिती मिळताच आज भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी माडखोलमध्ये जात ग्रामस्थांना धीर देत झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी माडखोल सरपंच संजय शिरसाट, तसेच ग्रामस्थ उपस्थित होते. नुकसानीचा पंचनामा करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही उपस्थितांना तेली यांनी दिली.
