*कोकण Express*
*कुडाळमध्ये शिवसेना वर्धापनदिनी जो राडा झाला तो जाणूनबुजून घडविला*
*कुडाळातील राडा बाळासाहेबांच्या शिवसेनेला काळिमा फासणारा…*
कोरोना महामारीच्या संकटात आरोग्य विभागातील रिक्त पदांमुळेच लोक मृत्यूमुखी पडत आहेत असे असताना शिवसेनेचा मुख्यमंत्री असताना आमदार वैभव नाईक ही रिक्त पदे भरण्यात अपयशी ठरले आहेत. कुडाळमध्ये शिवसेना वर्धापनदिनी जो राडा झाला तो जाणूनबुजून घडविण्यात आला. कोरोनाच्या महासंकटात आपल्या राजकीय स्वार्थापोटी कोरोनापेक्षा महाभयंकर विष शिवसेनेच्या वर्धापनदिनी जिल्ह्यात पेरण्याचे काम आमदार नाईक यांनी केले या घटनेचा आपण निषेध करत आहोत असे भाजपचे प्रदेश सदस्य दत्ता सामंत यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
कुंभारमाठ येथील निवासस्थानी पत्रकार परिषद झाली. यावेळी मंदार लुडबे तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते. श्री. सामंत म्हणाले, कुडाळमध्ये दोन दिवसापूर्वी जो राडा झाला तो जाणूनबुजून घडविण्यात आला. आमदारांना जर पेट्रोल द्यायचेच होते तर त्यांनी आपल्या पेट्रोल पंपावर द्यायला हवे होते. इंधन दरवाढीला केंद्र शासन आणि राज्य शासन जबाबदार आहेत. आमदार नाईकांना माहित होते की राणेंच्या पेट्रोल पंपावर कोणी पेट्रोल घ्यायला येणार नाही. त्यामुळे मोजक्याच शिवसैनिकांना बोलावून त्यांनाच पेट्रोल द्यायचे होते. जिल्ह्यातील जनता फुकट काहीतरी मिळतेय म्हणून त्याठिकाणी धावणारी नाही. ही जिल्ह्याची संस्कृती नसून जिल्ह्यातील जनता स्वाभीमानी आहे. त्यामुळे सत्तेचा आणि पोलिस बळाचा वापर करून आमदारांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी जो स्टंट करण्याचा प्रयत्न केला तो बाळासाहेबांच्या शिवसेनेला काळीमा फासणारा आहे. आपली राजकीय वाटचाल ही शिवसेनेतूनच झाली. हिंदुत्त्वाचा धागा पकडून शिवसेनेत प्रवेश केला. राणे जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्या नेतृत्त्वाखाली शिवसेनेच्या घोषवाक्यानुसार ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण करत शिवसेना जिल्ह्यात वाढविली. आजही त्याच घोषवाक्यानुसार आपण काम करत आहोत. कोरोनाच्या संकटातून आज जिल्ह्याला बाहेर काढण्याची गरज आहे. त्याचदृष्टीकोनातून आपण काम करत आहोत. मी केलेल्या कार्याची माझे राजकीय गुरू माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर यांनी घेत फोन करत आशिर्वाद व शाबासकी दिली हीच आपल्यासाठी मोठी पोचपावती आहे. चांगले काम केले तर त्याला चांगले म्हणण्याची जिल्ह्यातील जनतेची भूमिका असते. चांगले पेरले तर चांगलेच उगवते असेही त्यांनी स्पष्ट केले.
आज कोरोनाचे महासंकट आहे. आपल्या पक्षाचे मुख्यमंत्री आहेत. आपण आमदार आहात. त्यामुळे आरोग्य विभागातील डॉक्टर, नर्ससह अन्य जी ३३१ पदे रिक्त आहेत ती भरण्यासाठी आमदारांनी प्रयत्न करायला हवेत. या रिक्तपदांमुळेच अनेक लोक मृत्यू पावत आहेत. पहिल्यांदा कोणी वयोवृद्ध मृत्यू पावल्यास आमदार त्यांच्या घरी जात होते. मात्र आता कोरोनाच्या काळात अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत. शिवसेनेचेही अनेक पदाधिकारी यात मृत्यू पावले असताना त्यांच्या घरी जात सांत्वन न करता आमदारांनी त्यांना वार्यावर सोडण्याचे काम केले आहे. यावरून त्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे दिसून आले. आरोग्य व्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. शासन म्हणून कोणतेही धोरण आखले जात नाही हे दुर्दैव आहे. वैभव नाईक दोन वेळा आमदार झाले. ते चुकून आमदार झाले. दहशत हद्दपार करणार असे ते सांगत होते. मात्र जो दहशतवाद होता तो आमदार नाईकांनी शिवसेनेच्या वर्धापनदिनी प्रकट केला. विनाशकाले विपरीत बुद्धी आमदारांना झाली आहे. कुडाळसारख्या शांत व सुसंस्कृत तालुक्याला बदनाम करण्याचे काम त्यांनी केले आहे. आरोग्याचे जे तीन तेरा वाजले आहेत त्यावरील लक्ष विचलित करण्यासाठीच त्यांनी हा उपक्रम राबविला. त्यांचे हे कृत्य अशोभनीय आहे. याचे उत्तर पुढील राजकीय वाटचालीत आमदार नाईकांना निश्चितच मिळेल. आमने सामनेची वल्गना लोकप्रतिनिधीने करायची नसते तर त्यांनी संयम पाळायचा असतो. जनतेचा तो पालक असतो. ज्यांनी निवडून दिले त्या जनतेला काही देणे या भावनेतून त्यांनी काम करायला हवे. नीलेश राणे, नीतेश राणे यांना खुले आव्हान देत आहेत. हा कुस्तीचा आखाडा आहे की अन्य काही हे आपल्याला समजले नाही. अशा वल्गना करण्याची भाषा कोणीही करू नये असे आपल्याला वाटते. आज सर्वांनी जिल्ह्यातील जनतेचे आरोग्य आणि मृत्यूचे प्रमाण कसे शून्य होईल यासाठी प्रयत्न करायला हवेत. पण दुर्दैव वाटते की एवढे लोक मृत्यू पावले असताना हे लोकप्रतिनिधी राजकीय स्वार्थासाठी स्टंटबाजी करत आहेत. महामारीच्या काळातील काळीमा फासणारी घटना आमदार नाईकांनी घडविली त्याचा आपण निषेध करत असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाने विलगिकरण केंद्रे स्थापन केले आहेत त्याला पंधरा दिवस होऊन गेले होते. अशा परिस्थितीत जर गावातील रुग्ण थेट ऑक्सीजन बेडवर जात असेल तर याचा अर्थ काय? त्यामुळे गावातील रुग्ण हे पहिले विलगिकरण केंद्रात दाखल व्हायला हवेत. ते न होता अंगावर ताप काढताहेत. हे असेच सुरू राहिले तर जिल्ह्यातील कोरोनाची लाट कधीही ओसरणार नाही. यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात दक्षता समिती स्थापन व्हायला हवी. या समितीने गावात आवश्यक ती कार्यवाही केली तरच का कोरोना हद्दपार होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.
