नितेश राणे हे फसवेगिरीचे अनभिषिक्त सम्राट…! -नगरसेवक सुशांत नाईक

नितेश राणे हे फसवेगिरीचे अनभिषिक्त सम्राट…! -नगरसेवक सुशांत नाईक

 *कोकण Express*

*नितेश राणे हे फसवेगिरीचे अनभिषिक्त सम्राट…! -नगरसेवक सुशांत नाईक*

*कणकवली ःप्रतिनिधी*

सरपंच विम्यावरून पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका करताना आमदार नितेश राणे म्हणाले की, “पालकमंत्री उदय सामंत व आमदार नितेश राणे यांच्या शब्दात फरक आहे.” ज्या नितेश राणेंची पार्श्वभुमी ही फसवेगिरी आणि शब्द फिरवण्याची राहिली आहे, त्यांनी स्वतःचीच पाठ थोपटून घ्यावी यासारखी दुसरी हास्यास्पद गोष्ट असुच शकत नाही. नाणार येथील विनाशकारी रिफायनरी प्रकल्पाविरोधात गिर्ये-रामेश्वर येथील जनता पोटतिडकीने रस्त्यावर उतरली. तेव्हा या जनतेचे नेतृत्व करण्यासाठी आमदार नितेश राणेंनी सर्व देवळांमध्ये घंटानाद आंदोलन केले, विधानसभेत राजदंड पळवण्याचा प्रयत्न करून स्टंटबाजी केली, जमीन मोजणी करणार्‍या अधिकार्‍यांना मतदारसंघात पाय ठेवू देणार नाही अशी जाहीर धमकी दिली, मुंबईतील आझाद मैदानावर प्रकल्पग्रस्तांच्या मेळाव्यात तावातावाने भाषणे केली. मात्र ही सर्व नौटंकी भाजपवर दबाव आणून पक्षात प्रवेश मिळवण्यासाठी होती, हे एव्हाना उघड झाले आहे. भाजपमध्ये प्रवेश मिळाल्यावर नाणार रिफायनरी प्रकल्पाला विरोध करणारे नितेश राणे आपला शब्द फिरवुन रिफायनरी प्रकल्पाचे जोरजोराने समर्थन करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवणारे रिफायनरी विरोधक आता तोंडघशी पडलेले आहेत. राज्यभरात मराठा बांधवांचे मेळावे घेताना ब्राम्हणद्वेषाने पछाडलेल्या नितेश राणेंनी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरेंना महाराष्ट्रभूषण पुरस्कार द्यायला विरोध केला, त्यांचा एकेरी भाषेत उल्लेख केला, राम गणेश गडकरींचा पुतळा पाडणाऱ्याचा जाहीर सत्कार करून त्याला पाच लाख रुपयांचे बक्षीस दिले, संभाजी भिडेंवर अश्लाघ्य भाषेत टिका केली, स्वातंत्र्यवीर सावरकरांना माफीवीर संबोधून ते देशाला कलंक आहेत असे म्हटले आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची हाफ चड्डीवाले म्हणुन प्रतारणा केली होती. त्यांच्या शब्दांवर विश्वास ठेवुन काही मराठा समाजातील युवक त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. विश्वासघात करण्याची सवयच असलेल्या नितेश राणेंनी भाजपमध्ये प्रवेश करताच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शिबिरांना हजेरी लावली, सावरकरांना जयंती-पुण्यतिथी निमित्त अभिवादन केले आणि संभाजी भिडे त्यांना प्रातःस्मरणीय झाले. ज्या नितेश राणेंनी आपल्या राजकीय कारकिर्दीत फक्त फसवेगिरीच केली आणि आपल्या राजकीय स्वार्थासाठी एखाद्या सरड्याने रंग बदलावेत त्यापेक्षा जास्त वेगाने राजकीय भुमिका बदलल्या, ते नितेश राणे आता नेमके कोणत्या तोंडाने पालकमंत्र्यांवर टिका करीत आहेत…?

कणकवली शहरातील प्रकल्पग्रस्तांना व स्टॉलधारकांना नुकसानभरपाई मिळत नाही, तोपर्यंत कणकवली शहारात राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरू करू देणार नाही, अशी राणाभीमदेवी थाटात नितेश राणेंनी गर्जना केली होती. कणकवली शहरात सॉइल टेस्टिंग करण्यासाठी आलेल्या कंपनीच्या अधिकार्‍यांना पिटाळून लावले. काही प्रकल्पग्रस्तांना सोबत घेऊन थेट दिल्ली गाठून केंद्रीय मंत्र्यांची भेट घेत नौटंकी केली. इतकेच काय तर शहरातील वयोवृद्ध नागरिकांना उपोषणाला सुद्धा बसवले. त्यानंतर हायवेच्या ठेकेदारासोबत नितेश राणेंच्या ‘अर्थ’पूर्ण वाटाघाटी झाल्यावर राष्ट्रीय महामार्ग हा राष्ट्रीय हिताचा प्रकल्प असल्याने आपण कणकवली शहरात काम अडवणे चुकीचे आहे, असे सांगून त्यांनी सर्व प्रकल्पग्रस्तांना तोंडघशी पाडले. शहरातील प्रकल्पग्रस्तांना कोणताही वाढीव मोबदला मिळाला नाही. ठेकेदार कंपनीशी साटेलोटे करून कणकवली शहरात दस्तरखुद्द छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळाच गटारावर बसवण्याचे घृणास्पद प्रयत्न करण्यात आले पण जिल्हाभरातील सजग शिवप्रेमींनी हे कारस्थान वेळीच हाणून पाडले.

एप्रिल २०१७ मध्ये चव्हाण ग्रुप ऑफ कंपनीची ‘प्रतिभा दुध डेअरी’ जिल्हा दुध उत्पादक संघाकडून संकलित होणार्‍या दुधाचे मार्केटिंग करणार असल्याचे नितेश राणेंनी जाहीर केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यात १ लाख लीटर दुध संकलन करण्याच्या व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून शेतक-यांना १० हजार दुधाळ जनावरे वाटप करण्याच्या मोठमोठ्या बाता मारल्या. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दुध उत्पादक शेतकर्‍यांकडून जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाने दुध खरेदी करून ते प्रतिभा डेअरीला द्यावे आणि प्रतिभा दुध डेअरी त्या दुधाचा मोबदला जिल्हा दुध उत्पादक सहकारी संघाला देईल, असा करार करण्यात आला. आमदार म्हणुन नितेश राणेंनी या सर्व व्यवहाराची जबाबदारी स्वीकारली. प्रतिभा दुध डेअरीने जिल्हा दुध उत्पादक संघाकडून वर्षभर दुध घेतले परंतु त्या दुधाचे पैसेच दिले नाहीत. प्रतिभा दुध डेअरी पैसे देत नसल्यामुळे जिल्हा दुध उत्पादक संघ सिंधुदुर्गातील गोरगरीब शेतकर्‍यांना त्यांच्याकडून संकलित केलेल्या दुधाचे पैसे देऊ शकला नाही. अशा प्रकारे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकर्‍यांचे स्वकष्टाचे सुमारे २ कोटी २५ लाख रुपये प्रतिभा दुध डेअरीने थकवले. ज्या नितेश राणेंनी मध्यस्थाची भूमिका घेत व्यवहाराची जबाबदारी घेतली होती, त्यांनी प्रकरण अंगाशी येताच हात झटकून अगदी पद्धतशीरपणे काढता पाय घेतला. नितेश राणेंच्या शब्दावर विश्वास ठेवुनच गोरगरीब दुध उत्पादक शेतकरी देशोधडीला लागले. फसवेगिरी करणे आणि खोटे बोलणे हा नितेश राणेंचा स्थायीभावच बनला आहे. अशा प्रकारे आपल्या राजकीय भुमिकांवरुन पुर्णपणे पलटी मारण्याची सवय असलेल्या आणि फसवेगिरी करून मतदारसंघातील गोरगरीब जनतेला देशोधडीला लावणाऱ्या आमदार नितेश राणेंना पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर टिका करण्याचा नैतिक अधिकारच उरलेला नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!