*कोकण Express*
*युवा उद्योजक सचिन नारकर यांचे निधन*
*फोंडाघााटः (संंजना हळदिवे )
फोंडाघाट येथील रहिवाशी, युवा उद्योजक, पत्रकार सचिन श्यामसुंदर नारकर (43) यांचे काही दिवसापूर्वी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील खाजगी रूग्णालयात निधन झाले. त्यांच्या अकाली जाण्याने फोंडाघाटमध्ये हळहळ व्यक्त होत आहे.
सचिन नारकर हे अतिशय शांत, संयमी आणि हरहुन्नरी व्यक्मित्व म्हणून फोंडाघाटमध्ये प्रसिध्द होते. फोंडाघाटच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. फोंडाघाट संस्कृती कलामंचचे ते अध्यक्ष होते. संगीत आणि गायनाची त्यांना विशेष आवड होती. संस्कृती कलामंच्यावतीने दरवर्षी गुढीपाडव्यानिमित्त नववर्षाच्या स्वागतासाठी फोंडाघाटमध्ये शोभायात्रा आणि सांस्कृतिक कार्यक्रम आयोजन करण्यात त्यांचा पुढाकार असे. दुसर्यांच्या अडीअडचणीला धावून जाणे, दुसर्यांना मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. त्यांनी विविध क्षेत्रात अनेक माणसे जोडली होती. सचिन नारकर यांच्या अकाली जाण्याने फोंडाघाटवासीय तसेच त्यांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. त्यांच्या पश्चात वडील, पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, वहिनी, पुतणे असा परिवार आहे. फोंडाघाट येथील चंद्रराज लोणचे उद्योगाचे मालक दिनेश नारकर यांचे ते बंधू होत.

