फडणवीसांचे सोडा, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आधी पहा

फडणवीसांचे सोडा, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आधी पहा

*कोकण  Express*

*फडणवीसांचे सोडा, स्वतःच्या कार्यकर्त्यांचे आधी पहा !*

*पालकमंत्र्यांच्या संपर्कात कोण आहेत ते कळल्यावर राणेंच्या पायाखालची वाळू सरकेल…*

*नगरसेवक कन्हैया पारकर यांचा निलेश राणेंना टोला*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री आणि राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची रत्नागिरीत भेट झाली. उदय सामंत यांनी गयावया केल्यामुळे मनात नसूनही देवेंद्र फडणवीस यांनी वेळ दिली, असा अजब दावा माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश चिटणीस निलेश राणे यांनी केला आहे. राणे यांनी फडणवीस यांचा विषय बाजूला ठेवून आपल्या कार्यकर्त्यांपैकीच कोण कोण पालकमंत्र्यांचा संपर्कात आहेत, याचा एकदा शोध घ्यावा. त्यांची नावे कळली तर राणेंच्या पायाखालची वाळू घसरेल आणि राणेंची उरलीसुरली संघटना बुडीत निघेल, पलटवार माजी नगराध्यक्ष कन्हैया पारकर यांनी भाजपा प्रदेश चिटणीस निलेश राणेंवर केला आहे.

मुळात कॅबिनेट मंत्र्याने विरोधी पक्षनेत्याला भेटण्यात काहीच गैर नाही. महाराष्ट्राच्या राजकारणात अशा सौहार्द पूर्ण भेटींची उज्ज्वल परंपरा आहे. पण सौहार्दाचे राजकारण आणि राणे यांचा दूरदूरचा संबंध नाही. त्यामुळे त्यांना अशा प्रत्येक भेटीत खुसपटेच दिसत असतात. आणि दिसत नसतील तेव्हा राणे ती शोधून काढतात. उदय सामंत यांनी या भेटीचा इन्कार केलेला नाही. भेट गुप्तच घ्यायची असेल तर मतदारसंघात कशाला घेईन, दुस-या शहरात घेतली असती, असा खुलासाच पालकमंत्र्यांनी केला आहे. त्यामुळे उगाच दावे करू नये, असे कन्हैया पारकर म्हणाले आहेत.

निलेश राणे यांना सध्या काही काम उरलेले नाही. त्यामुळे ते काहीतरी आरोप करुन, ट्वीटरवर काहीतरी विधाने करुन चर्चेत राहण्याचा प्रयत्न करीत असतात. त्यांच्याकडे काही काम नसेल तर त्यांनी आपल्याच जवळच्या कार्यकर्त्यांकडे आणि त्यांच्या हालचालींकडे बारकाईने लक्ष ठेवणे आवश्यक आहे, असा टोला पारकर यांनी लगावला आहे.

निलेश राणे यांनी आपल्या जवळच्या कार्यकर्त्यांचे कॉल डिटेल तपासले, किंवा देवेंद्र फडणवीस यांना सांगून कार्यकर्त्यांचा सीडीआर काढला तर मोठा भूकंप होईल. राणेंच्या जवळचेच कार्यकर्ते प्रत्यक्षात राणेंपेक्षा उदय सामंत यांच्या संपर्कात अधिक असतात. गेल्या दोन वर्षात या कार्यकर्त्यांनी आणि नेत्यांनी राणेंना जेवढे फोन केले त्यापेक्षा पाचपट जास्त फोन उदय सामंत यांना केले आहेत, असे म्हणत पारकर यांनी निलेश राणे यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेतला आहे.

राणे यांची राजकीय ताकद संपली आहे. सरकार दरबारी त्यांचे वजन उरलेले नाही. त्यांच्यासोबत राहून आपले काही भले होणार नाही. त्यामुळे पर्याय शोधण्यास राणेंच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी सुरुवात केली आहे. गेल्या दोन वर्षांत अनेक राणे समर्थकांच्या रत्नागिरी वाऱ्या वाढल्या आहेत. त्या कार्यकर्त्यांचा सीडीआर आणि टॉवर लोकेशन अधिक माहिती देऊ शकतील. निलेश राणे यांनी उदय सामंत किंवा शिवसेनेच्या इतर नेत्यांच्या उचापती करु नयेत. त्यांनी आपला पक्ष आणि उरले सुरले समर्थक नीट सांभाळावेत. या नेत्यांनी आपला बोरिया बिस्तर बांधण्यास सुरुवात केली आहे. निलेश राणे यांना अशा कार्यकर्त्यांचे फोन नंबर हवे असल्यास देण्याची माझी तयारी आहे, असा टोलाही पारकर यांनी लगावला आहे.

निलेश राणे यांनी स्टंटबाजी करुन बातम्यांत राहण्याचा प्रयत्न करु नये. उदय सामंत आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात विश्वासाचे नाते आहे. निलेश राणे यांच्या आरोपांमुळे ते कमकुवत होणार नाही. उलट राणेंच्या आरोपांमुळे ते विश्वासाचे नाते आणखीन दृढ होईल. त्यामुळे आपल्या पक्षातले सूर्याजी पिसाळ कोण ते शोधून त्यांचा बंदोबस्त करण्यास निलेश राणे यांनी प्राधान्य द्यावे. अन्यथा, कणकवलीचा एकमेव मतदारसंघ हातचा जाऊन राणेंना विजनवासात जाण्याची वेळ येणार, हे नक्की आहे, असे म्हणत कन्हैया पारकर यांची निलेश राणेंना टोला लगावला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!