कणकवली तालुक्यात सह्याद्री पट्ट्याला सर्वाधिक चक्रीवादळाचा फटका

कणकवली तालुक्यात सह्याद्री पट्ट्याला सर्वाधिक चक्रीवादळाचा फटका

*कोकण Express*

*कणकवली तालुक्यात सह्याद्री पट्ट्याला सर्वाधिक चक्रीवादळाचा फटका…!*

*चक्रीवादळा मध्ये वीज वितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान…!*

*नरडवे, फोंडाघाट, घोणसरी गावातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या मालमत्तेची पाहणी…!*

*तहसीलदार रमेश पवार,बी.डी. ओ. चव्हाण व सभापती मनोज रावराणे यांनी नुकसान झालेल्या ठिकाणी जात दिली भेट…!*

*कणकवली ः प्रतिनिधी (संजना हळदिवे)*

अरबी समुद्रावर घोंगावणार्‍या चक्रीवादळाचा फटका सर्वाधिक नरडवे गावाला बसला आहे. या चक्रीवादळा मध्ये वीज वितरण कंपनीचे सर्वाधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान तहसीलदार रमेश पवार,बी.डी. ओ. चव्हाण व सभापती मनोज रावराणे यांनी आज नरडवे, फोंडाघाट, घोणसरी गावातील नुकसानग्रस्त नागरिकांच्या मालमत्तेची पाहणी केली. तालुक्यातील अन्य गावात अजूनही पंचनामे सुरू असल्याने नुकसानीची अंतीम आकडेवारी उद्यापर्यंत प्राप्त होण्याची शक्यता आहे.


कणकवली तालुक्यात सह्याद्री पट्ट्याला सर्वाधिक चक्रीवादळाचा फटका बसला आहे. यात सांगवे महसूल मंडळाअंतर्गत 62 घरांचे 7 लाख 40 हजार इतके नुकसान झाले आहे. यामध्ये नरडवे गावात सर्वाधिक 35 घरांची छपरे उडून मोठे नुकसान झाले आहे. याच बरोबर दिगवळे, भिरवंडे या गावातही मोठे नुकसान झाले आहे. कणकवली शहरांमध्ये अंशता 12 घरांचे 5 लाख 50 हजार, वागदे मंडळ अंतर्गत पाच घरांचे दिड लाख, नांदगाव मंडळ अंतर्गत दहा घरांचे एक लाख 85 हजार, फोंडाघाट मंडळा अंतर्गत 4 लाख 35 हजार 690 आणि तळेरे मंडळाअंतर्गत एक लाख 6 हजार 900 रुपये मिळून तालुक्यात 133 घरांचे 21 लाख 67 हजार 590 रुपये इतकी नुकसान झाले आहे. याच बरोबर जनावरांच्या 29 गोट्यांचे 3 लाख 23 हजार इतके नुकसान झाले आहे. तालुक्यातील वागदे मंडळाअंतर्गत शाळा इमारतींचे 2 लाख 73 हजार 760 रुपये इतके नुकसान झाले आहे. कणकवली शहरातील वीज वितरण कंपनीचे 5 लाख 50 तर फोंडाघाट परिसरात 6 लाख 80 हजार असे विज वितरणचे एकूण 12 लाख 30 हजार तर वीज तारांचे 4 लाख 64 हजार मिळून 16 लाख 94 हजार इतके नुकसान झाले आहे.
तालुक्यातील विविध गावांमध्ये अजूनही नुकसानीची आकडेवारी तयार होत असून उद्या पर्यंत एकूण तालुक्याच्या नुकसानाचे चित्र स्पष्ट होईल.अशी माहिती तहसीलदार रमेश पवार यांनी दिली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!