*कोंकण एक्सप्रेस*
*कुडाळमधील ‘नमो उद्यान’ जिल्ह्यासाठी आदर्शवत : पालकमंत्री नितेश राणे*
*कुडाळ-सांगीर्डेवाडी येथील नमो उद्यानाचे लोकार्पण*
*कुडाळ ः प्रतिनिधी*
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेली ‘नमो उद्यान’ योजना प्रत्येक शहरात राबविण्याचा प्रयत्न व्हावा. कुडाळ शहरात साकारलेले नमो उद्यान जिल्ह्यासाठी आदर्शवत असून, इतर नगरपंचायतींनीही या कामाचा बोध घ्यावा, असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले. कुडाळ शहराच्या विकासाच्या दृष्टीने आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली.
कुडाळ नगरपंचायतीच्या वतीने साकारण्यात आलेल्या कुडाळ-सांगीर्डेवाडी सर्व्हे नं. ६८/२ (६९) येथील नमो उद्यानाचे लोकार्पण पालकमंत्री नितेश राणे आणि खासदार नारायण राणे यांच्या हस्ते फीत कापून तसेच शिलालेखाचे अनावरण करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांनी नमो उद्यानाची प्रत्यक्ष पाहणी केली. सुमारे ३१ हजार ७८४ चौ. फूट क्षेत्रावर हे उद्यान विकसित करण्यात आले असून, या कामासाठी सुमारे एक कोटी रुपयांचा मंजूर निधी होता. उद्यानाचे काम पूर्ण करण्यात आले असून, यासाठी सुमारे ९९ लाख ९७ हजार रुपयांचा खर्च करण्यात आला आहे.
यावेळी खासदार नारायण राणे म्हणाले की, नमो उद्यानाचे काम चांगल्या पद्धतीने झाले असून, येणाऱ्या काळात कुडाळ शहर आदर्शवत ठरेल. शहराच्या विकासासाठी आवश्यक त्या सर्व बाबींना प्राधान्य देण्यात यावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
आमदार दीपक केसरकर यांनी नमो उद्यानाच्या चांगल्या कामाबद्दल कुडाळ नगरपंचायतीचे पदाधिकारी आणि अधिकारी यांचे कौतुक केले. आमदार निलेश राणे यांनी जिल्ह्यातील पहिले नमो उद्यान कुडाळ येथे साकारल्याचे सांगितले. अवघ्या चार महिन्यांत कामाची गुणवत्ता राखून हे उद्यान पूर्णत्वास नेण्यात आल्याचे त्यांनी नमूद केले. याच पद्धतीने इतर विकासकामेही वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने राबविण्यात येतील, असे सांगत त्यांनी कुडाळच्या विकासासाठी आणखी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सहआयुक्त, नगरविकास विभाग, सिंधुदुर्ग विनायक औंधकर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, उपाध्यक्ष दादा साईल, कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा प्राजक्ता बांदेकर, उपनगराध्यक्ष किरण शिंदे, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी खंडू पवळ यांच्यासह नगरपंचायत पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

