*कोकण Express*
*कोरोना रुग्णांसाठी जिल्हा परिषदकडुन ३०० बेडची व्यवस्था…*
*आरोग्य विभाग सेवा देण्यास कमी पडणार नाही,व्यक्त केला विश्वास– संजना सावंत*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
जिल्ह्यात कोरोना रुग्ण संख्या वाढत असताना जिल्हा परिषद आरोग्य विभाग सेवा देण्यासाठी कोणतीही कमतरता ठेवणार नसल्याचे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत यांनी केले. तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांना उपचारासाठी जिल्हा परिषद स्वतंत्र ३०० बेड उपलब्ध करणार असल्याचे सौ.सावंत यांनी सांगितले.तसेच जिल्ह्यात पूर्ण १२०० बेड उपलब्ध करण्याचे नियोजन सुरु आहे,असेही सौ. सावंत यांनी सांगितले.
कुडाळ तालुक्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्राधान्याने एग्रीकल्चर कॉलेज येथे, होमगार्ड भवन, वुमन्स कॉलेज येथे तसेच बॅरिस्टर नाथ पै येथे आणि अणाव नर्सिंग असे मिळून कुडाळ तालुक्यात तीनशे बेड चे उद्दिष्ट पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. कुडाळ तालुक्यातील कोविड सेंटरची यादी व उपलब्ध बेडची संख्या ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात येणार आहे. अशी माहिती अध्यक्ष संजना सामंत यांनी दिली. याबाबतचे पूर्ण नियोजन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ संदेश कांबळे यांच्या देखरेखीखाली झालेले आहे.
जिल्ह्यातील उर्वरित तालुकानिहाय जिल्हा परिषद आरोग्य विभाग माध्यमातून अशाच प्रकारचे नियोजन करून १२०० अतिरिक्त बेड उपलब्ध करून ठेवणार असल्याचे उद्दिष्ट जिल्हा परिषद सिंधुदुर्ग आरोग्य विभागाने निश्चित केलेले आहे.
यामध्ये करोना बाधित रुग्णांना दाखल करून घेणे तसेच त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांनी मार्फत देखरेख ठेवणे, नियमित तपासणी करून आवश्यकतेप्रमाणे ऑक्सिजन सुविधा आवश्यक असल्यास तात्पुरत्या स्वरूपात ऑक्सिजन व ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटअर ही सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जेणेकरून रुग्णांवर योग्य उपचार होतील व या आजारातून लवकर बाहेर येण्यास मदत होईल. याबाबत कुडाळ तालुक्यातील खाजगी डॉक्टर यांना देखील विनंती करून त्यांनीही आपली सेवा उपलब्ध करून देण्यास सहमती दर्शवली आहे.

