*कोंकण एक्सप्रेस*
*चाकरमान्यांच्या सोयीसाठी ५ सप्टेंबरपर्यंत सर्व कामे पूर्ण करा : पालकमंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश*
*सिंधुदुर्गनगरी, दि. २१* :
कोकणातील सर्वात मोठा आणि जिव्हाळ्याचा सण असलेल्या गणेशोत्सवात लाखो चाकरमानी जिल्ह्यात दाखल होतात. अनंत चतुर्दशीच्या कालावधीत विसर्जन मिरवणुका आणि चाकरमान्यांचा प्रवास निर्विघ्नपणे पार पडावा, यासाठी जिल्ह्यातील पायाभूत सुविधा सक्षम असणे अत्यंत आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी प्रशासनाची विशेष आढावा बैठक घेऊन सणाच्या काळात नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी सर्व यंत्रणांनी आपापली देखभाल-दुरुस्तीची कामे येत्या ५ सप्टेंबरपर्यंत युद्धपातळीवर पूर्ण करावीत, असे स्पष्ट निर्देश दिले.
प्राप्त झालेला निधी वेळेवर संबंधित विभागांकडे वर्ग करून स्थानिक प्रशासन व कंत्राटदारांना विश्वासात घेत कामांचा दर्जा उत्तम राखण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या. या बैठकीला जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष दादा साईल यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत गणेशोत्सवाच्या काळात वीज आणि दूरसंचार यंत्रणेवर येणारा अतिरिक्त ताण लक्षात घेऊन विशेष खबरदारी घेण्याचे आदेश पालकमंत्र्यांनी दिले. महावितरणने अखंडित वीज पुरवठ्यासाठी पूर्वतयारी करावी, तर बीएसएनएलने नेटवर्कमध्ये कोणताही तांत्रिक बिघाड होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे त्यांनी नमूद केले. यासोबतच मुंबई-गोवा महामार्ग व जिल्ह्यातील अंतर्गत रस्त्यांवरील खड्डे चांगल्या पद्धतीने बुजवून इतर आवश्यक दुरुस्त्या तातडीने पूर्ण कराव्यात, तसेच उपलब्ध निधीचा योग्य व पारदर्शक वापर व्हावा यावर त्यांनी भर दिला. सर्व विभागांनी परस्परांशी समन्वय ठेवून काम करण्याचे आवाहन करत कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी यंत्रणांना दिला.
या बैठकीदरम्यान उपस्थित लोकप्रतिनिधींनी ग्रामीण व शहरी भागातील स्थानिक समस्या मांडून त्या तत्काळ मार्गी लावण्याची मागणी केली. कामांच्या प्रत्यक्ष प्रगतीचा आढावा घेण्यासाठी पुढील गुरुवारी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे पालकमंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट करत प्रशासकीय यंत्रणेला कामांचा वेग वाढवण्याचे आदेश दिले.

