*कोंकण एक्सप्रेस*
*‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सिंधुदुर्गवासीयांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
*‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’चा संदेश जनमानसात पोहोचविला*
*सिंधुदुर्गनगरी, दि. २१*
‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा मृद व जलसंधारणाचा संदेश जनमानसात पोहोचविण्यासाठी जलसंधारण दिनानिमित्त सिंधुदुर्गनगरी येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. जिल्ह्यातील नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला, शासकीय अधिकारी-कर्मचारी, स्वयंसेवी संस्था, सामाजिक संघटना तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने सहभागी झाले.
सकाळी ६ वाजता सिंधुदुर्गनगरी येथील पोलीस परेड ग्राऊंडवर महा वॉकेथॉनची सुरुवात झाली. यावेळी सहभागींसाठी वॉर्मअप घेण्यात आला. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्प अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. जिल्हा परिषद अध्यक्ष प्रमोद कामत, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे, मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबुडकर, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर, उपवनसंरक्षक मिलिश शर्मा, अतिरिक्त जिल्हाधिकारी शुभांगी साठे, उपाध्यक्ष तुकाराम साईल, जिल्हा परिषद सदस्य ओरोस सुप्रिया वालावलकर, जिल्हा परिषद सदस्य दीपलक्ष्मी पडते, कार्यकारी अभियंता जलसंधारण संतोष शिरोडकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी उपस्थित सहभागीांना जलसंधारणाची शपथ दिली. उपस्थितांना संबोधित करताना त्या म्हणाल्या, एल निनोमुळे पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता असून भविष्यातील दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी बचतीचा संदेश सर्वदूर पोहोचविणे आवश्यक आहे. शेतीसाठी कमी पाण्यात घेता येणाऱ्या पर्यायांचा अवलंब करण्यासोबतच जनजागृतीच्या माध्यमातून मृद व जलसंधारणासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जलसंधारण सप्ताहात जिल्ह्यातील नागरिकांनी सक्रिय सहभाग घेतल्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले. सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी मृद व जलसंधारणाची चळवळ उभी राहत असल्याचेही त्यांनी सांगितले.
यानंतर जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे आणि मान्यवरांनी हिरवा झेंडा दाखवून ‘महा वॉकेथॉन–वॉक फॉर वॉटर’ला सुरुवात केली. ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ या संदेशासह सहभागी नागरिक, युवक, विद्यार्थी, महिला आणि अधिकारी-कर्मचाऱ्यांनी वॉकेथॉनमध्ये उत्साहाने सहभाग घेतला.
*वैभव नार्वेकर प्रथम*
महा वॉकेथॉनमध्ये सिंधुदुर्गनगरी येथील वैभव नार्वेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवत २५ हजार रुपयांचे बक्षीस पटकावले. वैभववाडी येथील वैभव वाघमोडे यांनी द्वितीय क्रमांक मिळवून १५ हजार रुपयांचे, तर सिंधुदुर्गनगरी येथील अभिजीत जेडयार यांनी तृतीय क्रमांक मिळवून १० हजार रुपयांचे बक्षीस मिळविले.
यासह ईश्वरी चिठ्ठीद्वारे सहभागींपैकी सात जणांची विशेष बक्षिसांसाठी निवड करण्यात आली. प्रत्येक विजेत्यास तीन हजार रुपये बक्षीस देण्यात आले. प्रथम क्रमांकासह विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते मेडल, प्रमाणपत्र आणि बक्षिसाची रक्कम वितरित करण्यात आली.
महा वॉकेथॉनच्या आयोजनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा हौशी ॲथलॅटिक संघटनेच्या कल्पना तेंडुलकर आणि बाळकृष्ण कदम यांचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजश्री सामंत यांनी केले.

