संकटातील जीवांचे तारणहार रामदास नाईक व महेश राऊळ यांचा गौरव

संकटातील जीवांचे तारणहार रामदास नाईक व महेश राऊळ यांचा गौरव

*कोंकण एक्सप्रेस*

*संकटातील जीवांचे तारणहार रामदास नाईक व महेश राऊळ यांचा गौरव*

*नागपंचमीनिमित्त भाजपा सिंधुदुर्ग व वेताळ प्रतिष्ठानतर्फे मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान*

*वेंगुर्ले  : प्रतिनिधी*

नागपंचमीच्या पावन पर्वाचे औचित्य साधून जीवदया, वन्यजीव संरक्षण व सर्पसंवर्धन क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे रामदास नाईक ऊर्फ काळाबाबु आणि सर्पमित्र महेश श्रीधर राऊळ यांचा भारतीय जनता पार्टी, सिंधुदुर्ग आणि वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळस यांच्या संयुक्त विद्यमाने मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी वेंगुर्ले पंचायत समितीचे सभापती शंकर घारे, तुळस सरपंच रश्मी परब, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई, उपनगराध्यक्ष सुहास गवडळकर, वेताळ प्रतिष्ठान सिंधुदुर्ग, तुळसचे अध्यक्ष डॉ. सचिन परुळकर, सचिव विवेक तिरोडकर, रामू परब, ग्रामपंचायत सदस्य सचिन नाईक व जयवंत तुळसकर , निवृत्त पोलीस सुधीर चुडजी, प्रदीप परुळकर, प्रज्वल परुळकर, सदगुरू सावंत, सागर सावंत, माधव तुळसकर, भूमी परुळकर आदी उपस्थित होते.
रामदास नाईक हे नदी, विहीर, तलाव व जंगल परिसरात अडचणीत सापडलेल्या साप, मगर, गाय, बैल, रेडे, कुत्रे तसेच विविध वन्यजीवांना सुरक्षितपणे बाहेर काढण्याचे कार्य करतात. तसेच जलस्रोतांमध्ये मृत्यू झालेल्या व्यक्तींचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे धाडसी व संवेदनशील कार्यही त्यांनी अनेक वेळा केले आहे. प्रसिद्धी अथवा मोबदल्याची अपेक्षा न ठेवता जीव वाचविण्याची त्यांची सेवा माणुसकीचे उदाहरण ठरली आहे.
महेश राऊळ हे गेल्या १५ ते २० वर्षांपासून सर्पमित्र व प्राणीमित्र म्हणून कार्यरत असून, मानवी वस्तीत आलेल्या सापांचे रेस्क्यू करून त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडतात. सुमारे ३२ जातींच्या सापांचे रेस्क्यू तसेच दुर्मिळ कॅस्ट्रो कोरल स्नेकचे तीन वेळा रेस्क्यू त्यांनी केले आहे. सर्पांविषयी जनजागृती करण्यासोबतच वन्यजीव रेस्क्यू, रक्तदान चळवळ आणि सामाजिक उपक्रमांमध्येही त्यांचा सक्रिय सहभाग आहे.
सभापती शंकर घारे म्हणाले, “रामदास नाईक आणि महेश राऊळ यांचे कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे. स्वतःच्या जीवाची पर्वा न करता ते संकटातील जीवांचे प्राण वाचवतात. त्यांच्या कार्यातून जीवदया आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश मिळतो. अशा सेवाभावी व्यक्तींचा सन्मान होणे अभिमानाची बाब आहे.”
भाजपा जिल्हा उपाध्यक्ष प्रसन्ना देसाई म्हणाले, “रामदास नाईक आणि महेश राऊळ यांचे कार्य समाजासाठी आदर्शवत आहे. संकटातील जीवांना वाचविण्यासाठी ते निःस्वार्थपणे कार्य करतात. रामदास नाईक यांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्याचे धाडसी कार्य कौतुकास्पद आहे. महेश राऊळ यांचे सर्पसंवर्धन व जनजागृतीचे कार्य उल्लेखनीय आहे. अशा कार्यकर्त्यांना प्रोत्साहन मिळणे आवश्यक असून त्यांच्या सेवेला मनापासून सलाम आहे.”
मान्यवरांच्या हस्ते दोघांना मानपत्र, शाल व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. नागपंचमीच्या निमित्ताने झालेला हा सन्मान जीवदया, मानवसेवा आणि निसर्गसंवर्धनाच्या कार्याचा गौरव असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सचिन परुळकर यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!