*कोंकण एक्सप्रेस*
*गोवा-मुंबई मार्गावर ८.२२ लाखांचा गुटखा जप्त*
*संशयित आरोपीला सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर*
*बचाव पक्षातर्फे ॲड. अशपाक शेख यांचा मुख्य युक्तिवाद*
*बांदा: प्रतिनिधी*
गोवा-मुंबई महामार्गावरील बांदा चेकनाक्यावर पोलिसांनी केलेल्या कारवाईत ८ लाख २२ हजार ३०० रुपये किमतीचा बेकायदेशीर व प्रतिबंधित गुटखा आणि तंबाखूजन्य पदार्थ जप्त केला आहे. मारुती सुझुकी ईको गाडीतून (MH-०७-AS-६४४१) ही वाहतूक केली जात होती. या प्रकरणी संशयित आरोपी आसिफ कादर मेमन (वय ४८, रा. कोलगाव, सावंतवाडी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याला ओरोस सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे.
कारवाई आणि न्यायालयीन प्रक्रिया: बांदा पोलिसांनी बेकायदेशीर गुटखा वाहतूक प्रकरणी आरोपी आसिफ मेमन याच्यावर ‘भारतीय न्याय संहिता’ (BNS) कलम १२३, २२३, २७१, २७५ आणि ‘अन्न सुरक्षा व मानके कायद्याच्या’ कलम ५९ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. अटकेनंतर आरोपीला न्यायालयात हजर केले असता, प्रथम पोलीस कोठडी आणि नंतर न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती.
जामिनाचे आदेश: दरम्यान, संशयिताच्या जामीन अर्जावर ओरोस येथील मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश-१ श्री. एस. टी. त्रिपाठी यांच्यासमोर सुनावणी पार पडली. न्यायालयाने आरोपी आसिफ मेमन याची ५०,००० रुपयांच्या जातमुचलक्यावर आणि काही अटी-शर्तींसह जामिनावर मुक्तता करण्याचे आदेश दिले.
या प्रकरणात बचाव पक्षातर्फे ॲड. अशपाक शेख यांनी मुख्य युक्तिवाद केला. त्यांना ॲड. नामदेव मठकर, ॲड. पंकज खरवडे आणि ॲड. विनय रजपूत यांनी सहकार्य केले.

